सैनिक फेडरेशनची पावसाळ्यात राज्यव्यापी वृक्षारोपण मोहीम
निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत यांची माहिती
सैनिक फेडरेशनने येणाऱ्या पावसाळ्यात राज्यव्यापी वृक्षारोपण आणि संगोपनाची मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार जिल्ह्यात १० हजार वृक्ष लावण्यात येणार असल्याची माहिती माजी खासदार आणि निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी सातारा येथील पत्रकार परिषदेत दिली.
सातारा : जागतिक तापमान वाढीमुळे निसर्ग चक्र धोक्यात आले असून त्याचे परिणाम मानवी जीवनावर होत आहेत. हे परिणाम कमी करण्यासाठी सैनिक फेडरेशनने येणाऱ्या पावसाळ्यात राज्यव्यापी वृक्षारोपण आणि संगोपनाची मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार जिल्ह्यात १० हजार वृक्ष लावण्यात येणार असल्याची माहिती माजी खासदार आणि निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी सातारा येथील पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी फेडरेशनचे सुर्यकांत पडवळ, डॉ. संजय लावंड, डॉ. रमेश शिंदे, शत्रुध्न महामुलकर, विलास जगताप, अंकुश चव्हाण, संजय निंबाळकर, सुधीर बेलोशे, समाधान निकम, प्रविण शिंदे, सचिन पोळ, मनोज भुजबळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सावंत म्हणाले, तापमान वाढ आणि पर्यावरण हा जागतिक पातळीवरील संवेदनशील विषय बनून राहिला आहे. दिवसेंदिवस तापमान वाढत असून त्यामुळे हिमशिखरे वितळण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळे अनेक भागात नैसर्गिक संकटांचा सामना दररोज मानवाला करावा लागत आहे. यासाठी सैनिक फेडरेशनने राज्यस्तरीय वृक्षारोपण आणि संगोपनाचा निर्णय घेतला आहे. तालुकास्तरावर जागा निवडून त्याठिकाणी शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, प्रशासकीय यंत्रणेच्या मदतीने रोपण करण्यात येणार आहे. यासाठीची बैठक जिल्हाधिकारी शेखर सिंह, वनविभागाचे महादेव मोहिते यांच्यासमवेत होत आहेत. शासनाकडून यासाठीची रोपे पुरविण्यात येणार आहेत. हि रोपे लावल्यानंतर त्यांच्या संगोपनाची जबाबदारी त्या त्या भागातील माजी सैनिक तसेच स्वयंसेवी संस्था, युवकांकडे देण्यात येणार आहे. लावलेली सर्व झाडे जगावीत यासाठीची कार्यपध्दती आम्ही ठरवली असून त्यानुसारच त्याची अंमलबजावणी होईल, असेही सावंत यांनी यावेळी सांगितले.