maharashtra

औंध पोलिस स्टेशनचे पाच पोलीस निलंबित

पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्याकडून कारवाई

Five policemen of Aundh police station suspended
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पाच दरोडेखोर औंध पोलिस स्टेशनचे लॉकअप सोडून पळाले होते. या प्रकरणातली कर्तव्य कसूरी संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांना भोवली आहे. पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे यांच्यासह चार पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी निलंबित केले आहे.

सातारा : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पाच दरोडेखोर औंध पोलिस स्टेशनचे लॉकअप सोडून पळाले होते. या प्रकरणातली कर्तव्य कसूरी संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांना भोवली आहे. पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे यांच्यासह चार पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी निलंबित केले आहे. या थेट कारवाईमुळे पोलिस दलामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
दिनांक 9 मे रोजी पहाटे औंध पोलीस ठाण्याचे लॉकअप तोडून पाच दरोडेखोर पळाले होते. या घटनेमुळे सातारा जिल्ह्याच्या पोलिस दलामध्ये एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी आपला तपास गतिमान करत त्यातील तीन दरोडेखोरांच्या मुसक्‍या आवळण्यात यश मिळवले. मात्र ज्या दिवशी ही घटना घडली त्याच दिवशी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षकांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत बधे, हवालदार संतोष कोळी, हवालदार कुंडलिक कटरे, हवालदार नारायणी व हवालदार गलांडे असे निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे.
गृहमंत्र्यांच्या जिल्हा दौऱ्यामध्ये संबंधित कर्मचाऱ्यांच्या ढिलाईमुळे संबंधित दरोडेखोर कोठडी तोडून पळाले. पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी या पाचही कर्मचाऱ्यांच्या संदर्भात प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. याचा अहवाल लवकरच अजयकुमार बन्सल यांना सादर केला जाणार आहे. पोलीस ठाण्याचा कारभार सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांना देण्यात आला आहे. पोलीस अधीक्षकांच्या कारवाई नंतर कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात पोलिस चाणाक्षपणे काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.