महाबळेश्वरमधील हॉटेल व्यावसायिकास मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा
रेंगडी येथील घटना : जीवे मारण्याच धमकी दिल्याचीही तक्रार
जावली तालुक्यातील गडी येथील मित्राकडे आलेल्या धारदेव, ता. महाबळेश्वर येथील एका हॉटेल व्यावसायिकास माऊंटन व्हिला रो हाऊस येथे रात्रीच्या वेळेस अडवून लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शाम मालुसरे नावाच्या व्यक्तीसह अन्य तीन अनोळखींवर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : जावली तालुक्यातील गडी येथील मित्राकडे आलेल्या धारदेव, ता. महाबळेश्वर येथील एका हॉटेल व्यावसायिकास माऊंटन व्हिला रो हाऊस येथे रात्रीच्या वेळेस अडवून लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शाम मालुसरे नावाच्या व्यक्तीसह अन्य तीन अनोळखींवर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अद्याप कोणास अटक करण्यात आलेली नाही.
याबाबत मेढा तालुका पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली माहिती अशी, तक्रारादार विशाल जयराज जाधव (वय 47, रा. धारदेव, ता. महाबळेश्वर ) हे दि. 12 डिसेंबर रोजी रात्री त्यांचे गडी, ता. जावली येथील मित्र शकील नुराणी यांना भेटण्यास व त्यांच्याकडे जेवण्यासाठी आले होते. त्यावेळी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास जाधव नुराणी यांच्याकडे जात असताना त्यांना गडी गावच्या हद्दीत बसलेल्या दोन अनोळखी व्यक्तीने कुठे निघाला आहेस, अशी विचारणा केली. त्यावेळी जाधव यांनी त्यांना नुराणी यांच्याकडे निघालो असल्याचे सांगितले. त्यावर अनोळखींनी जाधव यांना तू माघारी ये तुला दाखवतो अशी धमकी दिली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करुन जाधव शकील नुराणी यांच्या घराकडे गेले.
नुराणी यांच्याकडे जेवण केल्यानंतर रात्री साडे अकराच्या सुमारास विशाल जाधव त्यांच्या मोटार सायकलवरुन महाबळेश्वरकडे निघाले असताना गडी गावच्या हद्दीतील माऊंटन व्हिला रो हाऊस येथे अनोळखी चार व्यक्ती उभ्या होत्या. त्यांनी जाधव यांना तू आमच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये कशाला आला आहेस, तू कोण आहेस अशी विचारणा केली. त्यावर तुम्ही कोण आहात, असे विचारले असता आम्ही मालुसरे आहोत, असे सांगत दोन अनोळखींनी जाधव यांना गाडीवरुन खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरु केली. मी मर्डर केलेला माणूस असून आमच्या नादाला लागला तर तुझ्यासह तुझ्या कुटुंबाला कापून काढीन अशी धमकी जाधव यांना दिली. मारहाण करणाऱ्यापैकी एकाचे नाव शाम मालुसरे (रा. गोडवली, पाचगणी, ता. महाबळेश्वर, पूर्ण नाव माहिती नाही) असल्याचे जाधव यांना समजले.
या शाम मालुसरे व इतर तीन अनोळखी व्यक्तींकडून मला व माझ्या कुटुंबाच्या जीवाला धोका असून त्यांनी जाधव यांना जातीवाचक गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली असल्याची तक्रार विशाल जाधव यांनी मेढा पोलीस ठाण्यात दि. 14 डिसेंबर रोजी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी शाम मालुसरे याच्यासह अन्य तीन अनोळखींवर गुन्हा दाखल केला असून अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही. पी. शिंदे करत असल्याची माहिती मेढा पोलीस ठाण्यातून देण्यात आली.
एसपीसाहेब जावली, महाबळेश्वरातील गुंडगिरी थांबवा
वास्तविक निसर्गरम्य स्थळ असलेल्या जावली व महाबळेश्वर तालुक्यात देशभरातील अनेकांनी जमिनी खरेदी करुन फॉर्महाऊस बांधलेली आहेत. आपण संघराज्य संकल्पनेत समाज जीवन जगत असताना भारतीय संविधानानुसार देशातील कोणतीही व्यक्ती कोणत्याही राज्यात जमीन खरेदी करुन घर बांधून राहू शकते. व्यवसाय करु शकते. मात्र, महाबळेश्वर, पाचगणी, जावली तालुक्यात अशा प्रकारे जमीन घेवून घरे बांधून कधीतरी वास्तव्यास येत असलेल्या अनेकांना या दोन्ही तालुक्यातील गावगुंडाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. याबाबत पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी तातडीने अशा घटना रोखून नागरिकांना निर्भयपणे जगता यावे यासाठी कठोर कारवार्इ करण्याची गरज अनेकांनी व्यक्त केली आहे.
खंडणी मागण्याचेही प्रकार सुरु
जावली व महाबळेश्वर तालुक्यात पुण्या मुंबर्इसह इतर काही राज्यातील नागरिकांनी जमिनी खरेदी करुन बंगले बांधले आहेत. कधीतरी निसर्गाच्या सानिध्यात यायचे आणि निवांतपणा अनुभवल्यानंतर पुन्हा काही दिवसानंतर निघून जायचे. सेकंड होम संकल्पनेची रम्य कल्पना जमिनी खरेदी केलेल्या व बंगले बांधलेल्या नागरिकांना परिसरातील गावगुंडाकडून त्यांच्या वाटा अडवणे, धमकावणे तर खंडणी मागण्याचे प्रकारही घडत आहेत. स्थानिक व परके असा भेदभाव निर्माण करुन नागरिकांना धमकावणाऱ्या अशा गावगुंडांवर पोलीस दलाने कठोर कारवार्इ केली तरच अशा अपप्रवृत्तींना वचक बसणार आहे. अन्यथा निसर्गरम्य पर्यटन स्थळी नागरिकांना निर्भयपणे व शांतपणे जगता येर्इल.