तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दहाजणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
सातारा : तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दहाजणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 10 जानेवारी रोजी 2 ते 2.15 वाजण्याच्या दरम्यान जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या समोर राजेश रामचंद्र माने वय 52, रेखा राजेश माने वय 46 दोघेही रा. मानेवाडी, कारी, ता. सातारा यांनी उपोषणाची परवानगी न घेता उपोषण करून कोरोनाच्या अनुषंगाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याची तक्रार पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ भीमराव पाटील यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल केल्यानंतर वरील दोघांवर जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
दुसर्या घटनेत, दि. 10 रोजी रात्री 12.20 वाजण्याच्या सुमारास सातारा येथील राजवाडा परिसरात असणार्या चांदणी चौकात विशाल बापू साठे वय 32, रा. सर्वोदय कॉलनी, गडकर आळी, सातारा हे विना मास्क चार चाकी वाहन क्रमांक एम.एच.18 डब्ल्यू 2914 मध्ये विनाकारण फिरताना आढळून आले. त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने पोलीस कॉन्स्टेबल कोमल नामदेव पवार यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दि. 10 रोजी रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास चांदणी चौक येथे फैजल जैनुद्दीन काझी वय 24, रा. गुरुवार पेठ, सातारा, अनिकेत अनिल शिंदे वय 22, रा. शेंद्रे, ता. सातारा, आकाश रमेश धनवडे वय 22, रा. जय मल्हार पार्क, करंजे, सातारा हे चार चाकी वाहन क्रमांक एम.एच. 12 बीजी 5073 यामध्ये विना मास्क, विनाकारण फिरताना आढळून आल्याने त्यांच्या विरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर त्यांच्यावर ही आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिसर्या घटनेत, दि. 10 रोजी 1.40 वाजण्याच्या सुमारास अंबवडे बुद्रुक, ता. सातारा गावच्या हद्दीत रंगराव विद्यालय मैदानावर जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केल्याप्रकरणी रामदास धर्माजी जाधव, जीवन विष्णू पवार, काशिनाथ शंकर पाटील, महेश सिताराम लोहार सर्व रा. अंबवडे बुद्रुक, ता. सातारा यांच्याविरोधात पोलीस हवालदार रामचंद्र अहिवळे यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्यांच्यावर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.