maharashtra

धक्कादायक : उप प्रादेशिक परिवहन अधिकार्‍याचा ‘गेम’ करण्याचा डाव फसला

कटात वाहन निरीक्षकासह सातार्‍यातील एजंटांचा समावेश; कठोर कारवाई करण्याची आम आदमी पार्टीची मागणी

शिरवळ परिसरात सातारा उप-प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांना गाडी आडवी मारुन व जोरदार धडक देवून त्यांचा ‘गेम’ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऍलर्ट असलेल्या त्यांच्या वाहन चालकाने हा प्रयत्न हाणून पाडला. पाच दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेमुळे सातारा जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाली असून संबंधिताने केलेल्या भानगडी जिरवण्यासाठी त्याने आपल्या वरिष्ठ अधिकार्‍याचाच गेम करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी आम आदमी पार्टीने केलेली आहे.

सातारा : सातारा उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यरत असणारा वाहन निरीक्षक तसेच याच कार्यालयात वावर असणार्‍या काही अ‘संतोष’ एजंटांनी मिळून पाच दिवसांपूर्वी घातपात करण्याच्या हेतूने शिरवळ परिसरात सातारा उप-प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांना गाडी आडवी मारुन व जोरदार धडक देवून त्यांचा ‘गेम’ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऍलर्ट असलेल्या त्यांच्या वाहन चालकाने हा प्रयत्न हाणून पाडला. पाच दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेमुळे सातारा जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाली असून संबंधिताने केलेल्या भानगडी जिरवण्यासाठी त्याने आपल्या वरिष्ठ अधिकार्‍याचाच गेम करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी आम आदमी पार्टीने केलेली आहे.
याबाबत माहिती अशी की, सातारा उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयातील उचापतखोर, भ्रष्ट वाहन निरीक्षकाने गेल्या काही वर्षांपासून या कार्यालयात उच्छाद मांडलेला आहे. कार्यालयात वावर असणार्‍या काही असंतोषी एजंटांना हाताशी धरुन अनेक बेकायदेशीर कामे केल्यामुळे वरिष्ठ अधिकार्‍यांनी त्याच्या भानगडींचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविल्यामुळे हा अधिकारी गेल्या काही दिवसांपासून वरिष्ठांवर डूख धरुन होता. कार्यालयीन कामकाजात आक्षेपार्ह शब्द वापरणे, वरिष्ठांचे आदेश न मानणे, अरेरावीची भाषा वापरणे, पैशाशिवाय काम न करणे, कार्यालयात येणार्‍या अभ्यागतांना उद्धटपणे बोलणे आदी भानगडींमुळे तो वाहन निरीक्षक सातार्‍यात चांगलाच चर्चेत आला होता. त्यामुळे काही सामाजिक संघटनांनी त्याच्या विरोधात कारवाई व्हावी म्हणून सातारा जिल्हाधिकार्‍यांपासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत निवेदने देवून तशी मागणी केली होती. यामुळे गेल्या काही दिवसांपासून ‘त्या’ अधिकार्‍यासह अ‘संतोषी’ एजंटही चांगलेच गॅसवर बसले होते. परंतू या भानगडबाजांना सातार्‍यातील काही भानगडबाज ‘गुरु’ भेटल्यामुळे त्यांनी आपल्या विरोधात कारवाई करणार्‍या उप-प्रादेशिक परिवहन अधिकार्‍याचाच गेम करण्याचा प्लॅन आखला. त्यानुसार संबंधित वाहन निरीक्षकाने आपली कोल्हापूर बॉर्डरवरील ड्युटी सोडून तो सातार्‍यात आला. ठरल्याप्रमाणे उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी शिरवळ परिसरामध्ये कार्यालयीन कामकाजानिमित्त असल्याचे समजल्यानंतर हा वाहन निरीक्षक व तो अ‘संतोषी’ एजंट शिरवळ परिसरात पोहोचले. यावेळी उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी आपल्या सरकारी गाडीत बसलेले असताना त्या वाहन निरीक्षकाने इन्होवा गाडीतून सलग हॉर्न वाजवित त्यांचा पाठलाग केला. यावेळी त्या वाहन निरीक्षकाने गाडीला जोरदार धडक देवून त्यांचा घातपात करण्याचा तीनवेळा असफल प्रयत्न केला. या घटनेत उप-प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांच्या चालकाने प्रसंगावधान राखत गाडीतील स्वत:सह तीन अधिकार्‍यांचा जीव वाचवला.
पाच दिवस उलटूनही एवढा गंभीर प्रसंग घडूनही त्या वाहन निरीक्षकावर अद्याप वरिष्ठांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. कर्तव्य बजावत असणार्‍या वरिष्ठ अधिकार्‍यांचा घातपात करण्याचा प्रयत्न करणार्‍या ‘त्या’ वाहन निरीक्षकासह असंतोषी एजंटावर अद्याप कोणताही गुन्हा दाखल न झाल्याने कार्यालयीन परिसरासह सातारा शहरातही याबाबत जोरदार चर्चा सुरु आहेत. मात्र याबाबत अनेक अधिकारी माहिती देण्याचे टाळत आहेत.