मराठा बांधवांचा एक दिवस समाजासाठी जागरूक अभियान
सातारा शहर परिसरातील गावागावांमध्ये पोहोचणार आंदोलन
मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सातारा शहरांमध्ये साखळी उपोषण सत्र सुरू केले आहे. त्याला संपूर्ण सातारा जिल्ह्यातून वाढता पाठिंबा मिळत आहे. आंदोलन समितीच्या सुकाणू समितीने सातारा शहर आणि लगतच्या गावांमध्ये मराठा समाजाचे आरक्षण मिळण्यासाठी एक दिवस समाजासाठी हे जागरूकपर अभियान सुरू केले आहे.
सातारा : मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सातारा शहरांमध्ये साखळी उपोषण सत्र सुरू केले आहे. त्याला संपूर्ण सातारा जिल्ह्यातून वाढता पाठिंबा मिळत आहे. आंदोलन समितीच्या सुकाणू समितीने सातारा शहर आणि लगतच्या गावांमध्ये मराठा समाजाचे आरक्षण मिळण्यासाठी एक दिवस समाजासाठी हे जागरूकपर अभियान सुरू केले आहे. पहिल्या दिवशी कोडोली, संभाजीनगर, गोडोली या भागांमध्ये हे अभियान सुरू करण्यात आले. या गावातील 500 मराठा आंदोलकांनी पदयात्रा काढून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन साखळी उपोषणाला पाठिंबा दिला.
यावेळी पदयात्रेचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात येऊन फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. मराठा आरक्षणासाठी जालना येथे अंतरवाली सराटी हे संपूर्ण राज्यातील मराठा आरक्षणाचे आंदोलन केंद्र बनले आहे. मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला असून मनोज जरांगे यांच्या उपोषणाला संपूर्ण राज्यातून पाठिंबा मिळत आहे. त्याचे पडसाद सातारा जिल्ह्यातही उमटत असून गावागावांमध्ये पुढाऱ्यांना गावबंदी करणारे फलक उभे राहू लागले आहेत. सातारा शहरातही मराठा क्रांती मोर्चा सुकाणू समितीचे आंदोलन आक्रमक झाले असून त्यांनी साखळी उपोषणासह सातारा शहर आणि लगतच्या कोडोली, संभाजीनगर, विलासपूर या भागांमध्ये एक दिवस समाजासाठी हे प्रबोधनपर अभियान सुरू केले आहे. सुकाणू समितीचे पदाधिकारी गावागावात जाऊन मराठा आरक्षण का गरजेचे आहे, हे नागरिकांना समजावून सांगत आहेत.
समन्वय समितीचे संग्राम बर्गे, शरद काटकर, संदीप पोळ तसेच इतर पदाधिकारी प्रत्येक अभियानात सक्रिय सहभागी होत असून या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत आहे. शुक्रवारी कोडोली, बारवकर नगर, विलासपूर, गोडोली या भागातील अनेक सक्रिय सदस्य आणि नागरिक या पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते. ही पदयात्रा अजंठा चौकातून सुरू झाली. या पदयात्रेचे गोडोली बारावकर नगर येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. ही पदयात्रा तेथून पोवई नाक्यावर आली. आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. तेथून ही पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उपोषण स्थळावर आली. तेथे बसलेल्या महिला व पुरुष आंदोलकांना पाठिंबा देण्यात आला. राज्य शासनाने मराठा आरक्षणावर तातडीने तोडगा काढावा, अन्यथा त्याची राजकीय किंमत मोजावी लागेल, असा इशारा यापूर्वीच देण्यात आला आहे. पदाधिकाऱ्यांनी आरक्षणाच्या संदर्भात आग्रही भूमिका घेतली आहे. काही पदाधिकाऱ्यांनी सातारा जिल्ह्याच्या पालक मंत्र्यांना उपोषस्थळी बोलवून त्यांच्याशी चर्चा केली.