maharashtra

पुसेगावचे सुपुत्र, एन्काउंटर स्पेशालिस्ट राम जाधव यांचा राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रपती पोलीस पदकाने होणार सन्मान


Encounter specialist Ram Jadhav, son of Pusegaon, to be honored with President's Police Medal by Governor
सातारा जिल्ह्यातील पुसेगावचे सुपुत्र असलेले एन्काउंटर स्पेशालिस्ट सहायक पोलीस आयुक्त (निवृत्त) राम जाधव यांना पोलीस दलातील उल्लेखनीय सेवेबद्द्दल येत्या सोमवारी (दि. २१) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रपती पदक प्रदान करून सन्मान करण्यात येणार आहे. मुंबईतील राजभवनात होणाऱ्या शानदार समारंभात जाधव यांना हे पदक प्रदान करण्यात येणार आहे.

पुसेगाव : सातारा जिल्ह्यातील पुसेगावचे सुपुत्र असलेले एन्काउंटर स्पेशालिस्ट सहायक पोलीस आयुक्त (निवृत्त) राम जाधव यांना पोलीस दलातील उल्लेखनीय सेवेबद्द्दल येत्या सोमवारी (दि. २१) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रपती पदक प्रदान करून सन्मान करण्यात येणार आहे. मुंबईतील राजभवनात होणाऱ्या शानदार समारंभात जाधव यांना हे पदक प्रदान करण्यात येणार आहे.
पोलीस दलातील अतुलनीय कामगिरीबद्दल जाधव यांचा यापूर्वी २००१ मध्ये राष्ट्रपतींचे शौर्य पदक देऊन सन्मान करण्यात आला. २००२ मध्ये उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस महासंचालकांकडून विशेष प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.सन २००९ मध्ये  पोलीस दलातील गुणवत्तापूर्ण कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपतींचे गौरव पदक त्यांना प्रदान करण्यात आलं. तसेच २०१९ मध्ये त्यांना राष्ट्रपतींचे विशिष्ठ पोलीस पदक जाहीर करण्यात आले. कोरोनाच्या साथीमुळे गेली दोन वर्षे पदक वितरणाचे कार्यक्रम स्थगित ठेवण्यात आले होते. ते पदक त्यांना सोमवारी ( दि. २१) समारंभात प्रदान करण्यात येणार आहे. पोलीस सेवेत तीनवेळा राष्ट्रपती पदक मिळवणारे राम जाधव हे राज्यातील एकमेव आधिकारी ठरले आहेत.
राज्याचे माजी पोलीस महासंचालक कै. धनंजय जाधव यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राम जाधव यांनी एमपीएसीद्वारे पोलिस दलात प्रवेश केला. त्यापाठोपाठ त्यांचे बंधू भरत आणि पुतणे किशोर जाधव यांनीही या परीक्षेत यश मिळवले. पुसेगावच्याच धनंजय जाधव यांचा आदर्श जपल्याने राम, किशोर आणि भरत या जाधव कुटुंबातील तीन शिलेदारांबाबत सबंध जिल्ह्यात कौतुक आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात सहाय्यक आयुक्त या पदावरून गतवर्षी निवृत्त झालेल्या राम जाधव यांनी पुणे शहर, पुणे ग्रामीण, ठाणे ग्रामीण, दहशतवाद प्रतिबंधक पथक येथे  चमकदार कामगिरी बजावली आहे. पुण्यातील नामचीन गुंडांना वठणीवर आणले. संघटित गुन्हेगारी त्यांनी मोडून काढली. सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण केलेल्या प्रमोद माळवदकर, रॉबर्ट साळवे, श्याम दाभाडे, मोबीन शेख, महाकाली ढोकलिया अशा एकाहून एक खतरनाक सोळा गुंडांचे  त्यांनी एन्काऊंटर केले. सामान्य जनतेत पोलिसांप्रती विश्वासाचे  वातावरण तयार केले.  खंडणी उकळणाऱ्या, लूटमार करणाऱ्या गुंडांना वठणीवर आणले. व्यापारी वर्गाला सुरक्षित केलं. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखताना कुठल्या गुंडांची  फिकीर केली नाही आणि कोणाच्या दबावाची  तमा बाळगली नाही. गुन्ह्याचा माग लावण्याचे त्यांचे कसब अतुलनीय आहे.
कित्येक क्लिष्ट गुन्हे अत्यंत कौशल्याने तपास करून त्यांनी उघडकीस आणले. डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणासह कित्येक महत्वपूर्ण प्रकरणांचा छडा लावण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्याचबरोबर सनबर्न सारख्या पार्ट्यांवर छापे घालून घातक शस्त्रांसह अमली पदार्थ जप्त करण्याची महत्वपूर्ण कामगिरी त्यांनी बजावली. ससून रुग्णालयातून एका मृतदेहाचे शीर कापून पळवण्याच्या अत्यंत दुर्मिळ स्वरूपाच्या गुन्ह्याचा चिकाटीने तपास करून त्यांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पोलीस दलातील चमकदार कामगिरीबद्दल आतापर्यंत त्यांना साडेसातशेहून अधिक बक्षीसे  मिळाली आहेत. अत्यंत मितभाषी अन प्रसिद्धीच्या झोतापासून कायम दूर राहणाऱ्या राम जाधव या कर्तृत्ववान अधिकाऱ्याच्या सोमवारी ( दि. २१) होणाऱ्या या सन्मान सोहळ्यामुळे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या या यशाबद्दल सेवागिरी देवस्थान ट्रस्ट, श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ, पुसेगाव ग्रामपंचायत व त्यांच्या मित्रपरिवारातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले.