कोरेगाव मतदार संघातील रस्त्यांचे गौडबंगाल काय?
रमेश उबाळे : खेड येथील रस्ता कागदावर, तर बोरखळ येथील रस्त्याच्या निधीचा पत्ताच नाही
सातारा तालुक्यातील खेड येथील एक काँक्रिटीकरणं रस्ता कागदावर झाला आहे, तर बोरखळ येथील झालेल्या रस्त्याच्या निधीचा पत्ताच नाही. ही दोन्ही गावांचा कोरेगाव विधानसभा मतदार संघात समाविष्ट होत असून या रस्त्यांचे नक्की गौडबंगाल काय आहे?
कोरेगाव : सातारा तालुक्यातील खेड येथील एक काँक्रिटीकरणं रस्ता कागदावर झाला आहे, तर बोरखळ येथील झालेल्या रस्त्याच्या निधीचा पत्ताच नाही. ही दोन्ही गावांचा कोरेगाव विधानसभा मतदार संघात समाविष्ट होत असून या रस्त्यांचे नक्की गौडबंगाल काय आहे? असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे सरचिटणीस रमेश उबाळे यांनी थेट जिल्ह्याधिकाऱ्यांना निवेदन देत चौकशीची मागणी केली आहे.
याबाबत रमेश उबाळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सातारा शहराचे उपनगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेड येथे आमदारांच्या स्थानिक विकास निधी २०२१-२२ अंतर्गत मंजूर काम शिवसुंदर कॉलनी येथे रस्ता काँक्रिटीकरण व बंदिस्त गटर तयार करणे ८ लाख ४४ हजार ८६७ रुपये कामाची निविदा होऊन दि.११.०३.२०२२ रोजी काम सुरू झाले दि. २६.०५.२०२२ रोजी काम संपले.सदर काम सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या देखरेखीखाली झाले आहे. परंतु प्रत्यक्षात रस्ता व गटरचे काँक्रिटचे काम झाल्याचे दिसत नसून कागदावर व बोर्ड लावण्यापुरते मर्यादीत झाले आहे. मग काँक्रिट झालेच नाही तर हे काँक्रिट ठेकेदाराने खाल्ले की बांधकाम विभागाच्या अधिक्काऱ्यांनी खाल्ले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
याउलट बोरखळ येथे जिल्हा परिषद शाळा ते गौरींचौकापर्यंत काँक्रिटकरण रस्ता व गटर झाली आहे. याची माहिती आपण शासनाकडे मागितली होती. परंतु सदर माहिती आम्हाला देण्यात आली नाही. वास्तविक शासकीय निधीतून रस्ता व गटर झाले असेल तर ई-टेंडर निविदा प्रक्रिया राबविणे आवश्यक असते. परंतु तसे झाले नसल्याचे निदर्शनास येते. मग हा रस्ता कोणी दान धर्म म्हणून दिला आहे की साट्यालोट्यातुन झाला आहे? या बाबी विचारात घेऊन चौकशी करावी, अशी आमची मागणी आहे.
खेड ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेतील रस्ता व गटरवर निधी खर्ची होऊनही हा रस्ता फक्त कागदावरच दिसतो, तर बोरखळ येथील रस्ता व गटरचे काम पूर्ण होऊनही यासाठी कोणता शासकीय निधी वापरण्यात आला हेच माहिती नाही. त्यामुळेच कोरेगाव विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या रस्ता व गटरच्या कामाचे नक्की गौडबंगाल काय आहे? याची माहिती आम्हाला मिळाली पाहिजे लोकशाहीतला हा आमचा हक्क आहे. येत्या आठ दिवसात आम्हाला दोन्ही रस्ता व गटरच्या कामाची माहिती देऊन दोषीवर कारवाई करावी या कामामध्ये काही काळे बेरे झाले असल्यास दि.२३.०९.२०२२ रोजी उपोषणास बसू असा इशाराही रमेश उबाळे यांनी यावेळी दिला.
बोरखळचा रस्ता कुणी दान धर्म म्हणून दिला का?
बोरखळ ता.सातारा येथील रस्ता व गटरचे काम होवून सहा-सात महिने झाले हा रस्ता कोणत्या शासकीय निधीतून झाला की हा रस्ता जादूने झाला आहे, याची माहिती आपण शासनाकडे मागीतली होती. परंतु ही माहिती अद्याप आपणास मिळाली नाही. परंतु हा रस्ता कुणी दान धर्म म्हणून दिला आहे का? याची माहिती शासनाने आम्हाला द्यावी त्या दानशूर व्यक्तीचा आम्ही जाहीर सत्कार करू, असेही मत रमेश उबाळे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.