गजवडी, ता. सातारा येथे अंगणात बांधलेल्या शेळीवर बिबट्याने हल्ला केल्याने त्यामध्ये शेळीचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान परिसरात मोठी भिंत असल्यामुळे बिबट्याला मृत्यू झालेल्या शेळीला घेऊन जाता न आल्याने ही घटना उघडकीस आली.
सातारा : गजवडी, ता. सातारा येथे अंगणात बांधलेल्या शेळीवर बिबट्याने हल्ला केल्याने त्यामध्ये शेळीचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान परिसरात मोठी भिंत असल्यामुळे बिबट्याला मृत्यू झालेल्या शेळीला घेऊन जाता न आल्याने ही घटना उघडकीस आली. याबाबतची माहिती मिळताच सातारा तालुका वन विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पथकाने गजवडी व परिसरातील काही गावात पहाटे ५.३० वाजेपर्यंत रात्रगस्त घातली मात्र बिबट्या चकवा देण्यात यशस्वी झाला.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी, गजवडी, ता. सातारा हे गाव परळी खोऱ्यात आहे. या गावाच्या आसपास जंगल असल्यामुळे त्या ठिकाणी नेहमीच वन्य प्राण्यांचा वावर असतो. गजवडी येथील सदाशिव जिजाबा सपकाळ या शेतकऱ्याने गुरुवारी सायंकाळी घराच्या अंगणात शेळी बांधली होती. रात्री ९ ते ९.३० वाजण्याच्या सुमारास ती शेळी मृत्यूमुखी पडल्याचे सपकाळ यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी शेळीची पाहणी केली असता शेळीच्या मानेवर जखमा दिसून आल्यामुळे शेळीवर बिबट्याने हल्ला केल्याचे स्पष्ट झाले. बिबट्या गजवडीत दाखल झाल्याने भयभीत झालेल्या सपकाळ कुटुंबीयांनी बाबाराजे युवा मंचचे ठोसेघर पठार विभागाचे अध्यक्ष प्रवीण चव्हाण यांच्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. प्रवीण चव्हाण यांनी सातारा तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. निवृत्ती चव्हाण यांच्याशी संपर्क साधून गजवडीमध्ये बिबट्याने शेळीवर हल्ला केल्याची माहिती दिली. माहिती मिळताच डॉ. निवृत्ती चव्हाण, वनरक्षक राज मोसलगी, मारुती माने, सुरक्षारक्षक शेखर चव्हाण घटनास्थळी दाखल झाले.
वन विभागाच्या पथकाने मृत्यूमुखी पडलेल्या शेळीची पाहणी केल्यानंतर त्या शेळीवर बिबट्यानेच हल्ला केल्याचे स्पष्ट झाले. घराच्या शेजारी उंच भिंत असल्यामुळे बिबट्याला शेळीला घेऊन जाता आले नसल्याचा निष्कर्ष पथकाने काढला. दरम्यान पथकाने गजवडी परिसर, आरेदरे, करंडी फाटा, आसनगाव, परमाळे, कवंदनी, भैरवगड, पिरेवाडी, मांडवे, नागठाणे, बोरगाव, भरतगाव या गावांच्या परिसरात रात्री ११ ते पहाटे ५.३० वाजेपर्यंत रात्रगस्त घातली. या शोध मोहिमेत बिबट्या वन विभागाच्या पथकाला चकवा देण्यात यशस्वी ठरला.
काशीळ येथेही बिबट्याचे दर्शन
गुरुवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास काशीळ, ता. सातारा येथील गांधीनगरमध्ये असणाऱ्या जाधववस्ती येथे बिबट्याने दर्शन दिल्याची माहिती वन विभागाच्या पथकाला नागरिकांनी दिल्यानंतर वनरक्षक राज मोसलगी हे शुक्रवारी सकाळी काशीळ येथे दाखल झाले. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने त्यांनी पाहणी करून नागरिकांना खबरदारीच्या सूचना दिल्या.
बिबट्याचा वावर २५ किलोमीटर परिसरात
काही दिवसापूर्वीच ठोसेघर, ता. सातारा येथील परिसरातील एका वस्तीवर शेतामध्ये बिबट्याने एका बैलावर हल्ला केला होता. त्याच परिसरातून एक शेळी गायब झाली होती. जखमी झालेल्या बैलाची पाहणी केल्यानंतर त्याच्यावर बिबट्याने हल्ला केल्याचा निष्कर्ष वन विभागाच्या पथकाने काढला होता. बैलावर हल्ला करणारा बिबट्या हाच असावा असा निष्कर्ष आहे. एका बिबट्याचा वावर हा २५ किलोमीटरमध्ये असतो. २५ किलोमीटरचा आपला अधिवास सोडून तो कधीच जात नसल्याची माहिती डॉ. निवृत्ती चव्हाण यांनी यावेळी दिली.