युवकाकडून कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न ; एक्टिवा गाडीची मोडतोड, साडेतीन तोळ्याची सोन्याची चैन लंपास
सातारा : ठोसेघर, ता. सातारा येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते प्रवीण शंकरराव चव्हाण यांच्यावर आज दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास सज्जनगड घाटात एका युवकाने प्राण घातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. कोयत्याने वार केला असता प्रवीण चव्हाण यांनी वार चुकविल्याने त्यात ते थोडक्यात बचावले. यावेळी झालेल्या झटापटीत संबंधित युवकाने प्रवीण चव्हाण यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याची सोन्याची चैन चोरून नेली. दरम्यान, दुचाकीवरून पडल्याने जखमी झालेले प्रवीण चव्हाण जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी जाताच संबंधित युवकाने त्यांच्या एक्टिवा गाडीची कोयत्याने मोडतोड केली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, प्रवीण शंकरराव चव्हाण, वय ४०, रा. ठोसेघर, ता. सातारा हे ठोसेघर परिसरात सामाजिक काम करतात. ठोसेघर पठार बाबाराजे युवा मंचचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. गेल्या काही वर्षांपासून पत्रकार म्हणूनही ते काम करतात. आज सकाळी ते काही कामानिमित्त एक्टिवागाडीवरून सातारा येथे आले होते. काम आटपून ते पुन्हा एक्टिवावरून ठोसेघरकडे जात असताना दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास सज्जनगड घाटात पाठीमागून आलेल्या ॲक्सिस गाडीवरील युवक संदेश रमेश लोहार, वय १९, मूळ रा. ठोसेघर सध्या रा. समर्थ मंदिर परिसर, सातारा याने पाठीमागून त्याच्या एक्टिवा गाडीला लाथ मारली. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे प्रवीण चव्हाण हे गाडीवरून खाली पडले. दरम्यान त्या युवकाने आपल्या सोबत आणलेल्या पोत्यामधील कोयता काढून प्रवीण चव्हाण यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र चव्हाण यांनी ते वार चुकवले. गाडीवरून पडल्यामुळे प्रवीण चव्हाण यांच्या हात, घुडघा आणि पायाच्या अंगठ्याला जखम झाली. दरम्यानच्या काळात तो युवक तेथून निघून गेला. प्रवीण चव्हाण यांनी घडलेल्या घटनेची माहिती आपल्या मित्रांना देत त्यांनी एका दुचाकी चालकाला लिफ्ट देण्याची विनंती करून त्यानंतर ते जखमी अवस्थेत गजवडी फाटा येथे आले. दरम्यानच्या काळात संदेश लोहार पुन्हा चव्हाण यांच्या एक्टिवा गाडीजवळ आला. कोयत्याने वार करत गाडीचे नुकसान करून त्याने पलायन केले. तोपर्यंत प्रवीण चव्हाण यांची मित्रमंडळी गजवडी फाटा येथे दाखल झाली. त्यांनी तात्काळ प्रवीण चव्हाण यांना सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांना झालेल्या गंभीर जखमा पाहता रुग्णालयीन प्रशासनाने त्यांना ऍडमिट करून घेतले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी प्रवीण चव्हाण यांचा जबाब घेतला असून
संबंधित युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.