विधान परिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन गुजरातला गेले. तेथून ते गुवाहाटी येथे गेले. त्यांच्यासोबत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हेही आहेत.
सातारा : विधान परिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन गुजरातला गेले. तेथून ते गुवाहाटी येथे गेले. त्यांच्यासोबत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हेही आहेत.
एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्य सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न होत आहे. अशात बुधवारी ता. २२ सायंकाळी ५ वाजता शिवसेनेतर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. शंभूराज देसाई यांना नोटीस पाठवून या बैठकीला हजर राहण्यास सांगितले. पक्षाच्या बैठकीला हजर राहा नाही तर पक्ष सोडा, असा इशारा नोटीसमधून देण्यात आला होता.
राज्यात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी बुधवारी वर्षा बंगला, माऊंट प्लेझंट रोड, मुंबई ४००००६ येथे सायंकाळी ५ वाजता तातडीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीस आपली उपस्थिती आवश्यक आहे याची नोंद घ्यावी. ही सूचना आपण महाराष्ट्र विधानसभेत नोंदणी केलेल्या ई-मेल पत्यावर पाठविली आहे. तसेच याची माहिती व्हॉट्स ॲप व एसएमएसद्वारेही कळविली आहेत, असे पत्रातून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना कळविण्यात आले.
बैठकीस लिखित स्वरूपात वैध आणि पुरेशी कारणे प्रदान केल्याशिवाय आपणास अनुपस्थित राहता येणार नाही. बैठकीला उपस्थित न राहिल्यास आपण स्वेच्छेने शिवसेना पक्षाच्या सदस्यत्व सोडण्याचा तुमचा स्पष्ट इरादा आहे असे मानले जाईल.
परिणामी आपणावर भारतीय संविधानातील सदस्यांच्या अपात्रते संदर्भात असलेल्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असेही पत्रात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना कळविण्यात आले. हे पत्र मुख्य प्रतोद शिवसेना विधिमंडळ पक्ष सुनील प्रभू यांच्या स्वाक्षरीने पाठविण्यात आले.