पेट्री येथील राज कास हिल रिसॉर्टवर तालुका पोलिसांचा छापा
गिऱ्हाईकांसह हॉटेल मालक, मॅनेजर आणि वेटर्स अशा 21 जणांवर कारवाई
सातारा तालुका पोलिसांनी पेट्री येथील राज कास हिल रिसॉर्टवर छापा टाकून 21 जणांवर कारवाई केली आहे. यामध्ये गिऱ्हाईके हॉटेल मालक मॅनेजर आणि वेटरचा समावेश आहे.
सातारा : सातारा तालुका पोलिसांनी पेट्री येथील राज कास हिल रिसॉर्टवर छापा टाकून 21 जणांवर कारवाई केली आहे. यामध्ये गिऱ्हाईके हॉटेल मालक मॅनेजर आणि वेटरचा समावेश आहे.
दि. 28 रोजी रात्री उशिरा पेट्री ता. सातारा येथील राज कास हिल रिसॉर्ट नावाच्या हॉटेलमधील हॉलमध्ये काही तरुणांनी 6 महिला आणून त्या बारबाला या संगीताच्या तालावर उत्तान कपड्यात डान्स करत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी माहितीच्या अनुषंगाने संबंधित ठिकाणी जाऊन कारवाई करण्याचे आदेश सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना दिले होते.
त्यानुसार घोडके यांनी सातारचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत सातारा तालुका आणि शहर पोलीस ठाणे स्टाफ सह संबंधित ठिकाणी छापा टाकला असता हॉटेलमधील हॉलमध्ये सहा बारबाला बीभत्स हावभाव करीत नृत्य करीत असल्याचे दिसून आले. याचबरोबर उपस्थित गिऱ्हाईक हे यांचा आनंद घेऊन त्या बारबालांवर नोटा उडवीत होते. त्या अनुषंगाने हॉलमध्ये बारबाला महिलांसोबत डान्स करीत असलेल्या 18 इसमांना पोलिसांनी जागीच ताब्यात घेतले व या 18 जणांच्या ताब्यामधील 82 हजार 698 रुपये त्यामध्ये रोख रक्कम, मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले आहेत. तसेच हॉलमधील जी बी एस कंपनीची साऊंड सिस्टिम व डिस्को लाइट देखील जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी रिसॉर्टचे मालक, मॅनेजर आणि वेटर यांसह 21 जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दळवी करीत आहेत.
या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी सातारा शहर किरण कुमार सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, पोलीस उपनिरीक्षक डी.ए. दळवी, महिला पोलीस उपनिरीक्षक पाटील तसेच सातारा तालुका पोलीस ठाण्याकडील पोलीस हवालदार मालोजी चव्हाण, सचिन पिसाळ, पोलीस नाईक किरण जगताप, पोलीस कॉन्स्टेबल शंकर पाचांगणे, सातारा शहर पोलीस ठाण्याकडील पोलिस हवलदार निलेश यादव, पोलीस हवालदार महांगडे, पोलीस कॉन्स्टेबल बामणे यांनी सहभाग घेतला.