निसराळे येथील निवृत्त जवानाचे जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण
वडिलांच्या नावावर बोगस कर्ज प्रकरण झाल्याचा केला आरोप
वडिलांच्या नावावर बोगस कर्ज प्रकरण करणाऱ्या निसराळे सेवा सोसायटीच्या विरोधात तक्रारी करूनही कोणतीही कारवाई होत नाही. या अन्यायाच्या विरोधात येथील निवृत्त जवान बाळकृष्ण लक्ष्मण घोरपडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आपले बेमुदत उपोषण सुरूच ठेवले आहे.
सातारा : वडिलांच्या नावावर बोगस कर्ज प्रकरण करणाऱ्या निसराळे सेवा सोसायटीच्या विरोधात तक्रारी करूनही कोणतीही कारवाई होत नाही. या अन्यायाच्या विरोधात येथील निवृत्त जवान बाळकृष्ण लक्ष्मण घोरपडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आपले बेमुदत उपोषण सुरूच ठेवले आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सातारा जिल्हा सैनिक फेडरेशनचे पदाधिकारी बुधवारी रस्त्यावर उतरले होते. बाळकृष्ण घोरपडे यांच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात नमूद आहे की, निसराळे विकास सेवा सोसायटीबाबत आणि त्यांच्या बोगस कारभाराबाबत वारंवार तक्रारी करूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. सोसायटीचे सचिव संभाजी घोरपडे, धनाजी जाधव तसेच धनाजी घोरपडे व दीपक घोरपडे माजी विकास अधिकारी संभाजी यादव, जिल्हा बँकेच्या शाखेच्या माजी शाखाप्रमुख श्रीमंत तरडे यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. बाळकृष्ण घोरपडे यांनी आपल्या वडिलांच्या नावावर सोसायटीने वेगवेगळ्या माध्यमातून तब्बल आठ लाख 75 हजार रुपयांचे बोगस कर्ज प्रकरण केले आहे. या संदर्भात माझ्यावर अन्याय होत असून याची दखल जिल्हा उपनिबंधक कार्यालय सुद्धा घेत नाही, असा आरोप केला आहे.
त्यामुळे बाळकृष्ण घोरपडे यांनी गेल्या 14 ऑगस्ट पासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती. या उपोषणाच्या वेळी आमच्या कुटुंबीयांच्या जीवितास काही दखलपात्र घटना घडल्यास संबंधित अधिकारी जबाबदार राहतील, असा इशारा घोरपडे यांनी दिला आहे. या सेवा सोसायटीचे लेखा परीक्षण करून त्याचा सत्यता अहवाल सर्वांसमोर आणावा, अशी मागणी घोरपडे यांनी केली. घोरपडे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी न्यू सातारा जिल्हा सैनिक फेडरेशन आंदोलन स्थळी उपस्थित झाली. त्यांनी घोरपडे यांच्या वतीने जिल्हा प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांना निवेदन सादर केले व घोरपडे यांच्या उपोषणाला आपला पाठिंबा व्यक्त केला.