पावसाने जिल्ह्यात 35 शेळ्या व मेंढ्या थंडीने गारठून जागीच ठार
दहा अत्यवस्थ; खटाव व वाई परिसरातील घटना, पशुपालकांना नुकसानभरपाई देण्याची मागणी
जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने व थंडीने खटाव व वाई परिसरातील सुमारे 35 शेळ्या-मेंढ्या गारठून ठार झाल्या आहेत. तसेच 10 अत्यवस्थ असून या पशुपालकांना नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.
पुसेगाव : जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने व थंडीने खटाव व वाई परिसरातील सुमारे 35 शेळ्या-मेंढ्या गारठून ठार झाल्या आहेत. तसेच 10 अत्यवस्थ असून या पशुपालकांना नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.
खटाव परिसरात बुधवारी रात्रभर झालेल्या पावसाने मेघलदरे वाडी (ता. खटाव) येथील मेंढपाळ कुमार बाबा मदने यांच्या लहान मोठ्या अशा एकूण 15 शेळ्या व मेंढ्या थंडीने गारठून जागीच ठार झाल्याची घटना घडली. यापूर्वी कोरोनाने हैराण झालेला बळीराजाला पुन्हा एकदा निसर्गाने फटका दिल्याने येथील शेतकरी वर्ग पुरता हतबल झाला आहे. सबंधित घटनेचा प्रशासनाने तातडीने पंचनामा करून त्या पशुपालकांना नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की मेघलदरे वाडी येथील मेंढपाळ कुमार बाबा मदने यांनी नेहमीप्रमाणे बुधवारी सायंकाळी डोंगरातून शेळ्यामेंढ्या चारून आणून घराशेजारील अंगणात बांधल्या होत्या. दरम्यान रात्री अकराच्या सुमाास अचानक जोरदार पावसाने हजेरी लावल्याने कुमार व कुटुंबीयांची तारांबळ उडवली. पाऊस एवढा प्रचंड होता की कुटुंब सहजासहजी घराबाहेर पडूच शकत न्हवते. तरीही जीव धोक्यात घालून जवळ पास मिळेल तिथं शेळ्या मेंढ्या सुरक्षित स्थळी हलवण्याचा प्रयत्न मदने व कुटुंबीयांनी केला. मात्र तोपर्यंत शेळ्यामेंढ्या खूप गारठल्या होत्या परिणामी त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे मदने यांनी सांगितले.
दरम्यान पशुपालक बाळू मदने यांनी सांगितले की रात्रभर शेळ्या व मेंढ्या पावसातच उभ्या होत्या. पावसामुळे चिखल झाला होता व बसायला जागा नसल्यामळे काकडून त्यांचा प्राण गेला. दरम्यान परिसरात रात्रभर पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीला मोठा फटाका बसला आहे. रात्रभर पडलेल्या अवकाळी पावसामुळे ओढे नाल्यांना पुर आला आहे. शेतकर्यांना पुन्हा एकदा अस्मानी संकटाला सामोरे जावे लागणार असल्याची चिंता शेतकरीवर्गामधून व्यक्त केली जात आहे.
वाईत 20 बकर्या ठार; दहा अत्यवस्थ
भिरडाची वाडी, भुईंज (ता वाई) येथील शिवाजी शंकर धायगुडे हा मेंढपाळ बकर्यांचा कळप घेऊन देगाव येथील शिवारात थांबला होता. बुधवारी रात्री आणि गुरुवारी पहाटे अचानक पावसाचा जोर वाढला. पाऊस आणि हवामानात वाढलेल्या गारठ्यामुळे बकर्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळी आठ वाजता एकूण 20 बकर्यांचा मृत्यू झाल्याने व दहा अत्यवस्थ असल्याने भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
घटनेची माहिती वाईचे तहसीलदार रणजित भोसले यांना मिळताच त्यांनी शासकीय यंत्रणा घटनास्थळी पाठवली.