maharashtra

युवकाचे अपहरण करून त्याचा खून केलेले संशयित 36 तासात रत्नागिरी येथून जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखा आणि भुईंज पोलीस ठाण्याची संयुक्त कारवाई

युवकाचे अपहरण करून त्याचा खून केलेले तीन संशयित त्यामधील एक विधी संघर्ष बालक यांना स्थानिक गुन्हे शाखा आणि भुईंज पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्त कारवाई करत रत्नागिरी येथून जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.

सातारा : युवकाचे अपहरण करून त्याचा खून केलेले तीन संशयित त्यामधील एक विधी संघर्ष बालक यांना स्थानिक गुन्हे शाखा आणि भुईंज पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्त कारवाई करत रत्नागिरी येथून जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.
रहीम रसूल मुलानी वय 19, प्रज्वल विजयकुमार जाधव वय 19, दोघेही राहणार खानापूर, तालुका वाई आणि एक विधीसंघर्ष ग्रस्त बालक अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 2 फेब्रुवारी रोजी 5 वाजण्याच्या सुमारास चांदक, ता. वाई गावच्या हद्दीतून अभिषेक रमेश जाधव रा. खानापूर, ता. वाई याचे तिघांनी अपहरण केले होते. याबाबत तो ज्यांच्याकडे कामास होता त्यांनी त्याचे अपहरण झाल्याबाबतची फिर्याद भुईंज पोलीस ठाण्यात नोंदवली होती.
अपहरण झालेल्या मुलाचा तसेच संशयितांचा भुईंज आणि वाई पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदार त्यांच्या हद्दीत शोध घेत असताना 3 फेब्रुवारी रोजी दीड वाजण्याच्या सुमारास शेंदुरजणे, ता. वाई गावच्या हद्दीत अभिषेक जाधव हा जखमी अवस्थेत सापडला. त्याला औषधोपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय वाई येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी सातारा येथे पाठवले. सातारा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना अभिषेक जाधव याचा मृत्यू झाला.
ही घटना अतिशय गंभीर असल्याने सातारचे पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, वाईच्या उपविभागीय पोलीस अधिकारी शितल जानवे खराडे, कोरेगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, वाई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, भुईंज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे तसेच पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांना पोलीस अधीक्षक तसेच अपर पोलीस अधीक्षक यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या.
स्थानिक गुन्हे शाखा सातारा तसेच भुईंज पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने गुन्ह्याचा जलद गतीने तपास करताना घटनास्थळाकडे येणारे- जाणारे सर्व रस्ते व संशयितांच्या जाण्याच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून सर्वप्रथम या गुन्ह्यातील अज्ञात तीन आरोपी निष्पन्न केले. संशयितांच्या ठावठिकाण्याबाबत माहिती प्राप्त केली असता संशयित हे पोलादपूर मार्गे कोकणात गेल्याची विश्वसनीय माहिती प्राप्त झाली. त्याप्रमाणे तपास पथकाने गुन्हा घडलेल्या रात्रीपासून रायगड तसेच रत्नागिरी जिल्ह्यात संशयितांचा शोध घेतला असता दिनांक 3 फेब्रुवारी रोजी संबंधित संशयित हे दापोली परिसरात असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. स्थानिक गुन्हे शाखा तसेच भुईंज पोलीस स्टेशनच्या संयुक्त तपास पथकाने दापोली परिसरात संपूर्ण रात्रभर संशयितांचा कसोशीने शोध घेतला. त्यानंतर दिनांक 4 फेब्रुवारी रोजी दुपारी या गुन्ह्यातील दोन संशयित तसेच एक विधीसंघर्ष ग्रस्त बालक हे दापोली पोलीस स्टेशन हद्दीतील कर्दे बीच परिसरात दिसून आल्याने त्यांना पकडण्यात या तपास पथकास यश आले. या गुन्ह्याचा अधिक तपास वाईचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, वाईच्या उपविभागीय पोलिस अधिकारी शितल जानवे खराडे, कोरेगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, रत्नदीप भंडारे भुईंज पोलीस ठाण्याचे अंमलदार विकास गंगावणे, शंकर घाडगे, आनंदा भोसले, जितेंद्र इंगुळकर, प्रशांत शिंदे, सचिन नलावडे, अतुल आवळे, रविराज वर्णेकर, सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते, संजय गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलिस अंमलदार तानाजी माने, शरद बेबले, साबीर मुल्ला, प्रवीण फडतरे, गणेश कापरे, अमोल माने, अजित कर्णे, प्रवीण कांबळे, स्वप्नील दौंड, स्वप्नील माने, रोहित निकम, सचिन ससाने धीरज महाडिक यांनी केली आहे.
गुन्हा घडल्यापासून केवळ 36 तासात तपासाची चक्रे जलद गतीने फिरवून, कठोर परिश्रम करून एका संवेदनशील गुन्ह्यातील संशयितांना ताब्यात घेण्याची उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पोलीस अधीक्षक सातारा तसेच अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी तपास पथकाचे अभिनंदन केले आहे.