भोसलेवाडी, तालुका कराड येथील वीट व्यवसायिकांकडून सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळण्याचे काम चालू आहे. या ठिकाणी सैन्य दलात कार्यरत असणारे जवान परशुराम राठोड यांच्या राहत्या घरापासून अवघ्या पाच फूट अंतरावर वीट भाजण्यासाठी भट्टी रचनेचे काम सुरू आहे. तरीही महसूल विभाग मात्र गांधारीच्या भूमिकेत वावरत आहे.
उंब्रज : भोसलेवाडी, तालुका कराड येथील वीट व्यवसायिकांकडून सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळण्याचे काम चालू आहे. या ठिकाणी सैन्य दलात कार्यरत असणारे जवान परशुराम राठोड यांच्या राहत्या घरापासून अवघ्या पाच फूट अंतरावर वीट भाजण्यासाठी भट्टी रचनेचे काम सुरू आहे. तरीही महसूल विभाग मात्र गांधारीच्या भूमिकेत वावरत आहे. सैनिकाच्या कुटुंबाबाबत महसूल विभागाने केलेले हे दुर्लक्ष म्हणजे महसूल विभागाची अक्षम्य अशी चूकच आहे. याबाबतचे निवेदन अनुसया चव्हाण यांनी तहसील कार्यालयाला दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, राहत्या घरापासून लगत असणाऱ्या शेत जमिनीत सुभाष पवार यांचा अनधिकृतपणे वीट व्यवसाय चालू आहे. वीट व्यवसायासाठी लागणारा कच्चामाल माती, बगॅस, कोळशाची राख याच्यापासून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. त्यातच सुभाष पवार यांचे वीट भाजण्यासाठी वीट भट्टी लावण्याचे काम राहत्या घरापासून पाच फूट अंतरावरती चालू आहे. या वीटभट्टीमध्ये इंधन म्हणून दगडी कोळशाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे ही वीटभट्टी पेटवल्यास दगडी कोळशाच्या ज्वलनानंतर सल्फर डाय ऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड आणि नायट्रोजन मधील ऑक्साईड या विषारी वायुंची निर्मिती होते. त्यातून निघणाऱ्या विषारी धुरामुळे मी व माझ्या कुटुंबाचे आरोग्य धोक्यात येणार आहे. याबाबत अनुसया चव्हाण यांनी सुभाष पवार यांना विचारले असता त्यांनी शिवीगाळ व दमदाटी करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सदर वीट व्यवसायावर योग्य त्या कारवाईची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.