maharashtra

रिपाइं (आठवले गट) विद्यार्थी सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन


खेड नांदगिरी, ता. कोरेगाव येथील होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनुसूचित जाती- जमाती प्रवर्गाला प्रतिनिधित्व देण्यात यावे, यासह अन्य मागण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) विद्यार्थी सेनेने सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारा बाहेर आंदोलन करून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

सातारा : खेड नांदगिरी, ता. कोरेगाव येथील होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनुसूचित जाती- जमाती प्रवर्गाला प्रतिनिधित्व देण्यात यावे, यासह अन्य मागण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) विद्यार्थी सेनेने सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारा बाहेर आंदोलन करून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे, खेड नांदगिरी येथे अनुसूचित जाती जमातीच्या प्रवर्गाचे 351 पेक्षा अधिक मतदान आहे. गावातील एकूण तीन ते साडेतीन हजार मतदान असून सध्या तेथील ग्रामपंचायतीची निवडणूक होऊ घातली आहे. मात्र या निवडणुकीत संविधानाने दिलेले सामाजिक व राजकीय आरक्षण याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अनुसूचित जाती- जमाती प्रवर्गाला या निवडणुकीत उभे राहण्याचा हक्क असतानाही ग्रामसेवक व तथाकथित नेते मंडळी यांनी प्रशासनाला खोटी माहिती देऊन आमच्या प्रवर्गाचा निवडणुकीला उभा राहण्याचा हक्क हिरावून घेतला आहे. गट पंचवार्षिक निवडणुकीत त आमच्या प्रवर्गाला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली होती मात्र खेड नांदगिरी ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आमच्या प्रवर्गाला प्रतिनिधित्व दिले गेले नाही. त्यामुळे अनुसूचित जाती -जमाती प्रवर्गाला ग्रामपंचायत निवडणुकीत प्रतिनिधित्व द्यावे, या प्रवर्गासाठी राखीव असलेला 15 टक्के निधीचा वापर करण्यात न आल्यामुळे विकास कामे ठप्प झाली आहेत. त्या निधीचा वापर करण्यात यावा, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाला ग्रामपंचायत निवडणुकीपासून दूर ठेवणार्‍यांवर ट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, आमच्या प्रवर्गाला सामाजिक आणि राजकीय आरक्षण द्यावे अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

आंदोलनात आनंद वायदंडे, आरती ओसवाल, वैभव गायकवाड, हेमंत दोरके, आप्पा तुपे, सचिन वायदंडे, गणेश वाघमारे, रवींद्र बाबर, अक्षय कांबळे उपस्थित होते.