खंडाळा तालुक्यातील वाळू माफिया आणि महसूल विभाग यांचे साटेलोटे आता उघड गुपित आहे. बेसुमार वाळू उपसा आणि त्याकडे कानाडोळा करणारा महसूल विभाग यामुळे सर्वसामान्य लोकांना फक्त मनस्ताप सहन करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.
लोणंद ः खंडाळा तालुक्यातील वाळू माफिया आणि महसूल विभाग यांचे साटेलोटे आता उघड गुपित आहे. बेसुमार वाळू उपसा आणि त्याकडे कानाडोळा करणारा महसूल विभाग यामुळे सर्वसामान्य लोकांना फक्त मनस्ताप सहन करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.
खंडाळा तालुक्याच्या पूर्वेकडील भागात असलेल्या तांबवे धरणातील बराचसा भाग हा खंडाळा महसूल विभागाच्या अखत्यारीत येतो. याच भागातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची वाळू राजरोसपणे लूटली जात आहे पण याकडे जाणूनबूजून दूर्लक्ष करण्यात महसूल विभाग पटाईत झालेला आहे. वाळू माफियांकडून वर पासून खाली पर्यंत मिळणारी गलेलठ्ठ पाकीटं महसूल विभागाचं तोंड बंद करत असल्याची चर्चा सध्या तालुक्यात आहे.
वाळू चोरांच्या विरोधात अनेकदा तक्रारी येऊनही तहसीलदार याकडे कानाडोळा करण्यात पटाईत झाले असल्याचे चित्र सध्या तालुक्यात आहे. अनेकदा तक्रारीवर कारवाई करण्यास टाळाटाळ करण्यातच तहसीलदार धन्यता मानत आहेत तर कधीकधी वेळकाढूपणा करून वाळू चोरांना निसटून जाण्यासाठी वेळ देत असल्याची कुजबूज परिसरातील नागरिकांची आहे. त्यातूनही एखादाने पाठपुरावा केलाच तर वाहनां विरोधात पुरावा असूनही वाळू माफियांशी संगनमत करुन फक्त जुजबी वाळूसाठ्यांवर जप्तीची कारवाई मात्र यातून वाळू वाहतुकीची तसेच उत्खननासाठी वापरलेली जेसीबी सारखी वाहने शिताफीने वगळण्यात येत असल्याने तक्रारदार सुद्धा महसूल विभागाच्या पुढे हतबल झाल्याचे दिसून येत आहे.