सण, उत्सव व व्रते यांच्यामागचे शास्त्र लक्षात घेऊन श्रद्धापूर्वक साजरे करण्यात आपलेच कल्याण असते. वास्तविक आपल्या जीवनात नेहमीच संयम पाहिजे, पण तो पाळला जात नाही; म्हणून निदान सण, धार्मिक उत्सव व व्रतांच्या दिवशी तरी तो पाळला जावा, म्हणजे हळूहळू नेहमीच संयमित जीवन जगता येईल. कर्मकांडाच्या दृष्टीने सण, धार्मिक उत्सव व व्रते इतकी महत्त्वाची आहेत की, वर्षातील जवळजवळ ७५ टक्के तिथींना यांपैकी काही ना काही असतेच. यात श्रावण महिन्याला सण, धार्मिक उत्सव व व्रतांचा महिनाच म्हटले जाते. या महिन्यात येणार्या सण, धार्मिक उत्सव व व्रतांमध्ये नारळी पौर्णिमा हा एक सण साजरा केला जातो.
नारळी पौर्णिमेला करण्यात येणारे वरूणदेवतेचे पूजन
पावसाळा संपत आला की समुद्र शांत होतो, तेव्हा नारळी पौर्णिमा साजरी करतात. नागपंचमी नंतर श्रावणात येणारा हा दुसरा सण आहे. श्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी कोळी बांधव व समुद्रकिनारी रहाणारे लोक वरुणदेवतेप्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ शुभसूचक आहे, तसेच ते सर्जनशक्तीचेही प्रतीक मानलेले आहे. नदीपेक्षा संगम व संगमापेक्षा सागर जास्त पवित्र आहे. `सागरे सर्व तीर्थानि' असे वचन आहे. सागराची पूजा म्हणजेच वरुणदेवतेची पूजा. जहाजांनी मालाची वाहतूक करतांना वरुणदेव प्रसन्न असल्यास तो साहाय्य करतो.
नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राची पूजा करून नारळ अर्पण का करावा ?
(नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपतत्त्वात्मक यमलहरींचे आधिक्य असल्याने व नारळाच्या पाण्यातील तेजतत्त्व यमलहरींना ताब्यात ठेवत असल्याने जलावर ताबा मिळवणार्या सागररूपी वरुणदेवतेला नारळ अर्पण करतात.) या दिवशी ब्रह्मांडात आपतत्त्वात्मक यमलहरींचे आधिक्य असते. या लहरी ब्रह्मांडात भोवर्याप्रमाणे गतिमान असतात. वरूणदेवता ही जलावर ताबा मिळवणारी व त्याचे संयमन करणारी असल्याने या दिवशी सागररूपी वरुणदेवतेला आवाहन करून तिला नारळ अर्पण करून ब्रह्मांडात कार्यरत असणार्या यमलहरींना ताब्यात ठेवण्यासाठी प्रार्थना केली जाते. नारळातील पाण्यात तेजतत्त्वाचे प्रमाण अधिक असते. नारळातील पाणी हे आपतत्त्वाचे प्रमाण जास्त असणार्या यमलहरी ग्रहण करण्यात अतिशय संवेदनशील असते. वरुणदेवतेला आवाहन करतांना तिच्या कृपाशीर्वादाने यमलहरी नारळाच्या पाण्याकडे आकृष्ट होतात. नारळाच्या पाण्यातील तेजतत्त्व या यमलहरींना ताब्यात ठेवून त्यांतील रज-तम कणांचे विघटन करून त्यांना सागरात विलीन करते; म्हणून या दिवशी वायुमंडलातील यमलहरींचे नारळाच्या माध्यमातून उच्चाटन करून सागररूपी वरुणदेवतेच्या चरणी त्यांचे समर्पण करण्याला महत्त्व आहे. यामुळे वायुमंडलाची शुद्धी होते. यमलहरींच्या वातावरणातील अधिक्यामुळे शरीरात अधोगामी वहाणारे वायु कार्यरत् झाल्याने पाताळातून प्रक्षेपित होणार्या त्रासदायक लहरी पटकन जिवाच्या तळपायाकडे आकृष्ट झाल्याने त्याला त्रास होण्याची शक्यता जास्त असते.
समुद्राला नारळ `अर्पण' कसा कराल ?
नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करतांना तो पाण्यात फेकू नका, तर हळुवारपणे सोडा ! नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरुणदेवतेला आवाहन करून सागराला नारळ अर्पण करतात. ते करतांना काही जण नारळ पाण्यात फेकतात. त्यामुळे नारळ अर्पण करण्यामागील अपेक्षित लाभ मिळत नाही; म्हणून तो भावपूर्णपणे हळुवार पाण्यात सोडावा.
रक्षाबंधनचे महत्व आणि माहिती
हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. उत्तर भारतात हा सण राखी म्हणुन प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो म्हणुन प्रार्थना करतात. पुरातन काळात, जेव्हा स्त्री स्वतःस असुरक्षीत जाणते, तेव्हा ती अशा व्यक्तीस राखी बांधून भाऊ मानते, जो तिची रक्षा करील.
रक्षाबंधनचा सणाप्रमाणे दक्षिण भारतात कार्तिक महिन्यात कार्तिकेय सण असतो. या दिवशी बहीण आपल्या भावास जेवण देऊन त्याच्या दिर्घआयुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधन हे आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता व मांगल्य निर्माण करण्याचे बंधन आहे.
इंद्राच्या राणीने आपल्या मनगटावर एक धागा बांधला होता. ज्याच्या सामर्थ्याने वज्रानुसार राक्षसाचा पराभव केला. तेव्हापासून त्याची स्मृती म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पध्दत आहे. तसेच ऐतिहासिक काळात चित्तोडच्या राणी कर्मवतीने हुमाँयू बादशहाला राखी पाठवली व हुमाँयू बादशहाने पण आपल्या या बहिणीचे परकीय आक्रमणापासून संरक्षण केले.
राखी बांधण्याचा अर्थ आपण त्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वत:ला वाहून घेऊन तिच्या रक्षणाची जबाबदारी स्वकारतो. राखी बंधनाच्या या सणातून मित्रत्व, स्नेह व परस्पर प्रेम वृध्दिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे.
राजपूत स्त्रिया आपल्या शत्रूंच्या हातात राखी बांधून पुढे होणारा भयंकर संहार टाळीत असत व एकप्रकारे राखीचा उपयोग अहिंसेसाठी करीत असत. राखी पौर्णिमेच्या बऱ्याच अख्यायिका आहेत परंतू त्या माहित करून घेण्यापेक्षा आपण येथे फक्त सणांच्या हेतूला, उद्देशालाच महत्व देणार आहोत.
आपल्या संस्कृतीत स्त्रीला देवी मानले आहे. अशी ही देवतुल्य स्त्री भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते. हा टिळा फक्त मस्तकाच्या आदराचा नसून भावाच्या मस्तकातील सद्विचार वं सदबुद्धी जागृत राहण्यासाठीची पूजा आहे. सामान्य डोळ्यांनी जे पाहू शकत नाही ते सर्व विकार, भोग, लोभ, मत्सर, वासना, द्वेष,राग इत्यादींकडे भावाने आपल्या य तिसऱ्या डोळ्याने पहावे य हेतूने बहिण भावाला टिळा लावून त्रिलोचन बनविते. इतका त्या टिळयाचा खोल अर्थ आहे.
राखीचा धागा हा देखील नुसताच सुताचा दोरा नसून ते एक शील, स्नेह, पवित्रतेचे रक्षण करणारे, सतत संयमी ठेवणारे पुर्षार्थाचे पवित्र बंधन आहे. ह्या एवढयाशा धाग्याने कित्येक मने जुळून येतात. त्यांना भावनांचा ओलावा मिळतो वं मन प्रफुल्लीत होते.
एकमेकांना जोडणारा असा हा सण इतर कोणत्याही धर्मात संस्कृतीत नाही. सामाजिक ऐक्याची भावना जागृत ठेवण्यासाठी अशा प्रकारचे सण खूप महत्वाचे ठरतात. रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त आपल्या मनाप्रमाणे नाती जोडण्यास ह्या सणामुळे समाजास वाव मिळतो. ज्या समाजात अशा प्रकारची एकरूपता, ऐक्य असते असा समाज सामर्थ्यशाली बनतो हाच या राखी पौर्णिमेचा संदेश आहे.हल्लीच्या धकाधकीच्या काळात लहानपणी चिंचा, बोरांवरून ते अगदी आईच्या बाजूला कोण झोपणार यावरून भांडणारे ताई-दादा आता परस्परांना ई-पत्र, फोन किंवा चॅटद्वारे भेटण्याचा व राखी पौर्णिमा एकत्र साजरा करण्याचा आनंद उपभोगतात.
द्रौपदीने आपल्या मानलेल्या भावाला (कृष्णाला) बांधलेली जरतारी शेल्याची चिंधी, गरीब बहिणीने भावाच्या हातात बांधलेला धागा किंवा शाळकरी ताईने तयार केलेली राखी, राजपूत रमणीने बाजूच्या राजाला पाठवलेले राखीचे ताट, श्रीमंत बहिणीने भावाला बांधलेली सोन्याची किंवा चांदीची राखी काय किंवा आज इंटरनेटच्या माध्यमातून बहिणीने भावाला पाठवलेली ई-शुभेच्छापत्रसहित राखी काय या सर्वांमागे भावना एकच आहे ती म्हणजे भावाबहिणींचे परस्परांवरील प्रेम.
स्त्री कितीही मोठी, मिळवती झाली तरी तिच्या रक्षणाची जबाबदारी तिच्या भावावरच आहे हेच ती यातून त्याला सुचवू इच्छिते. यात तिचा दुबळेपणा नसून भावाच्या कर्तृत्वावरचा विश्वास दिसून येतो.रक्ताचे नाते असणारे भाऊ बहिण असोत किंवा मानेलेले असो, पण या नात्यामागची भावना पवित्र व खरी आहे. यात कुठेही फसवणूक नाही. त्या नात्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे राखी पौर्णिमा. त्यामुळेच तर भाऊ नसणारी स्त्री चंद्राला आपला भाऊ मानते व त्याला ओवाळते. अन् प्रत्येक आई आपल्या मुलाला चंदामामा म्हणूनच चांदोबाची ओळख करून देते.
तूच आमचा त्राता, रक्षणकर्त्ता म्हणून देवालाही त्या दिवशी राखी वाहतात आणि उपयोगातल्या सगळ्या वस्तूंना देवराख्या बांधण्याची प्रथाही आढळते. आमच्या लहानपणी सकाळी अंघोळ करून आम्ही आमच्या उपाध्यायांपुढे उभे राहायचो अन् ते घरातल्या प्रत्येकाला मंत्र म्हणून हातात राखी बांधायचे. तेव्हा काही कळायचे नाही. पण आता वाटतंय की ते इतर सर्व व्याधींपासून आमचे रक्षण व्हावे या हेतूने हे अभिमंत्रीत सुरक्षाकवच हातात बांधत असावेत (हल्लीतर प्रत्येक तीर्थक्षेत्री हातात बांधायचे दोरे मिळतात.)
असा हा दिवस अगदी लहानग्यांपासून ते वृद्धापर्यंत सर्वच जण आनंदाने साजरा करतात. हल्ली तर घरात एकच मुलगा/मुलगी असतांना ह्या राखीच्या निमित्ताने दोन परिवार एकमेकांच्या आणखीनच जवळ येत आहेत हे काय कमी आहे?आजही उत्तर-भारतात नोकर मालकाला राखी बांधतात व गरीब लोक धनवंतांना! यामागेही श्रेष्ठ व ज्येष्ठ लोकांनी व या सारख्या लोकांपासूनही रक्षणाची जबाबदारी आणि आपल्या कुटुंबीयांची जबाबदारी तुमच्यावरच आह हे ही सूचित होते.
रेशमी धाग्याला प्रेमाचा रंग …. रक्षाबंधन
घराच्या गच्चीत रूसून बसलेल्या आपल्या लहान बहिणीची समजूत घालण्यासाठी सर्वांत आधी जात असेल तर तो तिचा भाऊ! शाळेतून आपल्या मोठ्या ताईला आणण्यासाठी जाणार्या लहान भावाचा कोमल हात तिला संरक्षण देतो. अशा या बहिण-भावाचा रक्षाबंधनाचा सण त्यांच्या जीवनात रेशमी धाग्याला प्रेमाचा रंग देऊन जातो. लहान भावाच्या झालेल्या चुका स्वत:वर ओढवून घेणारी ताई आई-बाबाकडून मिळणारा ‘प्रसाद’ वाचविते. तर आपल्या ताईचे आभार मानण्यासाठी लहान भाऊ तिला आवडणारी वस्तू भेट देतो.
शाळेच्या मुख्याध्यापिका पहिल्या इयत्तेत झोपलेल्या लहानग्याला घेऊन जायला सांगतात तेव्हा त्याची ताई शांत निजलेल्या आपल्या भावाला हळूवार आपल्या वर्गात घेऊन जाते आणि त्याला मांडीवर झोपवून फळ्यावरील लिहिलेले आपल्या वहीत उतरवून घेत असते. लहान श्रुती रडतच आपल्या मोठ्या भावाच्या वर्गात गेली व तिला चिडवणार्या तिच्या वर्गातील मुलांची नावे सांगायला लागली. तिचे डोळे पुसत मधल्या सुटीत त्यांना चांगला मार देऊ सांगताच छोट्या ताईचे रडणे एकदम बंद झाले व ती पुन्हा हसत खेळत आपल्या वर्गात जाऊन बसली. तिच्या मते मोठ्या भावाने दिलेले आश्वासन म्हणजे काम फत्ते असंच ती समजते. शाळेत जाणारी लहान बहिण हसण्या खिदळण्यात केव्हा मोठी होते कळतच नाही. मग तिला आपल्या बाईकवर घेऊन कॉलेजात सोडणारा तिचा भाऊ तिचा ‘बॉडीगार्ड’च बनूनच जातो. तिच्या आवडीनिवडींची काळजी घेतो तर तिला संकटामधून आधार देतो.
ताईचे लग्न होऊन तिला निरोप देण्याचा क्षण येतो, तेव्हा तिचा भाऊ पाहुण्यांच्या सरबराईत मग्न असतो. ताई विरहाने धाय मोकलून रडत असताना भावाला लहानपण आठवते. सरबराईत गुंतलेले हात घेऊन तोही अश्रूभरल्या डोळ्यांनी बहिणीला भेटतो. भाऊ व बहिणीचे नाते रेशमी धाग्यासारखे नाजूक असते. रक्षाबंधन या सणाला बहिण भावाच्या हातावर राखी बांधते व भाऊ तिला प्रेमाची भेटवस्तू देतो. एवढेच नाही तर तिच्या संरक्षणासाठी खंबीर आहे याची ग्वाहीही देतो.
आपल्या देशात प्रेम, आपुलकी अजुनही कायम असल्याने रक्षाबंधन या सणाचे महत्त्व आजही कायम आहे.