maharashtra

भ्रष्टाचाराचे पुरावे द्या, अजिंक्यताऱ्यावरून उडी मारतो

खा. उदयनराजे यांचे आ. शिवेंद्रसिंहराजे यांना आव्हान; पालिकेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या कामाची केली पाहणी

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांचे बंधू आमदार शिवेंद्रराजे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांनी हिम्मत असेल तर पुरावे द्यावेत. जर भ्रष्टाचार सिद्ध झाला तर अजिंक्यतारा किल्ल्यावरील कडेलोट पॉइंटवरून मी उडी मारेन आणि पुरावे देवू शकले नाहीत तर त्यांनी उडी मारावी, असं आव्हान उदयनराजे यांनी शिवेंद्रराजेंना दिलं आहे.

सातारा : साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांचे बंधू आमदार शिवेंद्रराजे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांनी हिम्मत असेल तर पुरावे द्यावेत. जर भ्रष्टाचार सिद्ध झाला तर अजिंक्यतारा किल्ल्यावरील कडेलोट पॉइंटवरून मी उडी मारेन आणि पुरावे देवू शकले नाहीत तर त्यांनी उडी मारावी, असं आव्हान उदयनराजे यांनी शिवेंद्रराजेंना दिलं आहे.
सातारा पालिकेच्या वतीने पालिकेच्या नूतन इमारतीचे बांधकाम सध्या जिल्हा परिषदेच्या समोर सुरु आहे. त्याची पाहणी करण्यासाठी आज खासदार उदयनराजे भोसले हे सकाळीच तेथे पाेहचले हाेते. तेथेच त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह त्यांच्या नगरविकास आघाडीवर हल्लाबोल केला.
खासदार उदयनराजेंनी सातारा पालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकत हिम्मत असेल तर मी बोललेल्या गोष्टींवर उत्तर द्या. फक्त मिशीवर हात फिरवून काही होत नसतं, अशी टीका शिवेंद्रसिंहराजेंवर केली. यावेळी 50 च्या 50 नगरसेवक सातारा विकास आघाडीचे निवडून येतील, असा विश्वास देखील उदयनराजेंनी व्यक्त केला आहे. तुम्हाला जे काही मिळाले आहे ते पहिल्यापासून आयतं व काम न करता मिळालं आहे. जर सर्वसामान्य कुटुंबातील असता तर तुम्हाला लोकप्रतिनिधी देखील होता आलं नसतं, अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर टीकास्त्र सोडले. माझी सुरुवात नगरसेवक पदापासून झाली आहे. तुमचा सारखा मी आयता आमदार झालेलो नसल्याची खोचक टीका देखील खासदार उदयनराजे यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर केली.
उदयनराजे म्हणाले, पूर्वीच्या लोकांनी चोऱ्यामाऱ्या केल्या, भ्रष्टाचार केला, डांबर चोरलं त्यामुळे आम्ही तुमच्या हातात सत्ता दिली आणि तुम्ही पण तसेच निघालात. बोलणं सोपं असतं पण करणं फार अवघड असतं. पोवई नाक्यावर ग्रेट सेपरेटर (भुयारी मार्ग) बांधताना इथे स्विमिंग पूल बांधणार की काय? अशी टीका आमच्यावर केली. अहो, जर इथे उड्डाणपूल बांधला असता आणि चुकून एखादे वाहन खाली कोसळले असते तर किती मोठी घटना घडली असती? ही बाब त्यांना समजू नये का. सर्व परिस्थितीचा आढावा घेऊनच ग्रेड सेपरेटरचे बांधकाम करण्यात आले.
बांधकाम झाल्यानंतर याचे उद्घाटन आम्ही करणार, असं ते म्हणाले. मी म्हणतो, उद्घाटन घ्यायचं होतं ना. असंही तुम्हाला सर्व काही आयतं व काम न करताच मिळालेले आहे. तेव्हा घराण्यामुळे वीस वर्षे सत्ता यांच्याच हातात होती. हे जर सर्वसामान्य कुटुंबातील असते तर मला नाही वाटत ते कधी लोकप्रतिनिधी झाले असते.
सातारा शहराची हद्दवाढ झाली असून, नगरपालिकेची सध्याची इमारत कामकाजासाठी अपुरी पडत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेसमोरील दीड लाख स्क्वेअर फुट जागेत पालिकेची नूतन व सुसज्ज अशी नऊ मजली प्रशासकीय इमारत बांधली जात आहे. या इमारतीमधून निश्चितच शहराचे कामकाज अधिक प्रभावीपणे चालविले जाईल, असेही खा. उदयनराजे म्हणाले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, माजी शिक्षण सभापती सुनील काटकर आदी उपस्थित होते.