राज्य शासनाकडून महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत
कर्नाटक आगारांच्या गाड्यांना महिला सन्मान योजनेचा फटका
राज्य शासनाने महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत देणारी महिला सन्मान योजना शुक्रवारी रात्री बारा वाजल्यापासून लागू केली. या योजनेचे सातारा जिल्ह्यातील महिला प्रवाशांनी जोरदार स्वागत करत पहिल्या दिवशी प्रवासाचा लाभ घेतला.
सातारा : राज्य शासनाने महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत देणारी महिला सन्मान योजना शुक्रवारी रात्री बारा वाजल्यापासून लागू केली. या योजनेचे सातारा जिल्ह्यातील महिला प्रवाशांनी जोरदार स्वागत करत पहिल्या दिवशी प्रवासाचा लाभ घेतला. लांब पल्ल्याच्या तसेच जिल्हा अंतर्गत एसटी प्रवासाला चांगलाच प्रतिसाद मिळाला. मात्र या निर्णयामुळे कर्नाटक आगाराच्या गाड्यांना प्रवाशांसाठी तिष्ठत रहावे लागले.
महिला सन्मान योजना म्हणजेच महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केला होता. या योजनेनुसार महिलांना साधी, आराम, निमआराम, शिवनेरी आणि शिवशाही सर्वच एसटी प्रवासात 50 टक्के सवलत ठेवण्यात आली आहे. ही योजना शुक्रवारी रात्री बारा वाजल्यापासूनच सातारा जिल्ह्यातील सर्व आगारांमध्ये लागू करण्यात आली. या योजनेला महिला प्रवाशांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला. विशेषतः सातारा- पुणे व सातारा- बोरिवली, सातारा- कोल्हापूर, सातारा- सोलापूर, तळेगाव, मिरज, या महामार्गांवरील लांब पल्यांच्या प्रवासाला महिलांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. तसेच सातारा शहरांमध्ये शिक्षण व रोजगारासाठी येणाऱ्या श्रमिक महिलांनी सुद्धा आज आंतरजिल्हा एसटी सेवेचा लाभ घेतला.
या संदर्भात बोलताना आगार व्यवस्थापक रेश्मा गाडेकर म्हणाल्या, पहिल्या दिवशीच महिला सन्मान योजनेची यशस्विता मोजणे जरा घाईचे ठरेल. मात्र पहिल्या दिवशी विना थांबा फलाटांवर महिलांची प्रचंड गर्दी दिसून आली. उदाहरणार्थ पुणे-सातारा निम आराम एसटीचे भाडे दीडशे रुपये आहे. मात्र आता महिलांना हा प्रवास केवळ 75 रुपयात करता येणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्याने महिला वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे. या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवारी रात्रीपासून होईल. याची कल्पना खुद्द सातारा विभाग नियंत्रणाला सुद्धा नव्हती. मात्र निर्णय जाहीर झाल्यानंतर आगार व्यवस्थापन सर्व कर्मचाऱ्यांना या योजनेच्या प्रसारासाठी आगारांमध्ये सूचनाफलक लावण्याची धावाधाव करावी लागली.
शुक्रवारी कर्नाटक आगार परिवहनच्या बहुतांश गाड्या रिकाम्याच धावत होत्या. महिला सन्मान योजनेचा मोठा फटका कर्नाटक आगाराच्या गाड्यांना बसला आहे. सातारा आगारातून कर्नाटक राज्याच्या परिवहन सेवा बसच्या साधारण 35 ते 40 फेऱ्या होतात. यामध्ये बेळगाव, निपाणी, विजापूर, हैदराबाद अशा परराज्यातील ठिकाणांच्या गाड्या धावत असतात. या गाड्यांना मात्र फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले.