वाई-पाचगणी दरम्यान असणाऱ्या पसरणी घाटात कारमधून प्रवास करणाऱ्या जावली तालुक्यातील बहीण-भावंडांना दुचाकी आडवी मारून त्यांच्याकडून भर रस्त्यात गळ्यातील चैन, रोख रक्कम असा दोन लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबवला. याप्रकरणी पाचगणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : वाई-पाचगणी दरम्यान असणाऱ्या पसरणी घाटात कारमधून प्रवास करणाऱ्या जावली तालुक्यातील बहीण-भावंडांना दुचाकी आडवी मारून त्यांच्याकडून भर रस्त्यात गळ्यातील चैन, रोख रक्कम असा दोन लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबवला. याप्रकरणी पाचगणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात 4 जणांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईवरून आलेल्या बहिणींना पाचगणी, महाबळेश्वर फिरवण्यासाठी कारमधून घेऊन जात असतानाच कारमध्ये बसलेल्या शुभम दत्तात्रय बांगडे राहणार पिंपरी पोस्ट कुसुंबी तालुका जावळी व सुप्रिया लक्ष्मण वाघ, नीलम लक्ष्मण वाघ दोघीही राहणार मेढा तालुका जावली हे सगळे वाई वरून पाचगणीच्या दिशेने गेलेले असताना पाठीमागून येणाऱ्या तीन दुचाकी स्वरांनी अचानक कारला दुचाकी आडवी मारली. तसेच भर रस्त्यात आमच्याकडे तू गाडी काढवी मारलीस, तुझी गाडी आडवी मारल्याने माझी चप्पल तुटली, तुला नीट गाडी चालवता येत नाही का, हा बहाणा करत एकाने चालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळेस त्याचे इतर साथीदार पाठीमागून येऊन त्यांनी बहिण-भावाला देखील मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळेस सुप्रिया व नीलम यांनी गाडीतून उतरून संबंधीत लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडीमधील बसलेल्या दोन्ही युवतीना देखील या चारी अज्ञात चोरट्याने मारहाण केली. यानंतर त्यांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज लांबवला. या सर्व घटनेला प्रतिकार करत असतानाच या चार चोरट्यांनी गाडीमध्ये असलेल्या सगळ्यांना भीती दाखवत दोन लाख 50 हजाराचा ऐवज लुटून नेला. संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर मोटरसायकलचे नंबर शुभमने अॅप वर टाकून पाहिले असता हे नंबर वेगळ्याच गाड्यांचे असल्याचे समोर आले. पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यासंदर्भात तपास करत असून त्यांनी तपासाची सूत्रे गतिमान केली आहेत. शुभम दत्तात्रय वांगडे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.