maharashtra

मुख्यमंत्र्यांवर गप्प राहण्यासाठी राजकीय दबाव आहे का ?

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची बोचरी टीका

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी अलीकडे महाराष्ट्राला डिवचणारी वक्तव्ये केल्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला जाण्यापेक्षा इथे बसून त्यांना तात्काळ त्याच भाषेत उत्तर द्यायला पाहिजे होते.

सातारा : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी अलीकडे महाराष्ट्राला डिवचणारी वक्तव्ये केल्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला जाण्यापेक्षा इथे बसून त्यांना तात्काळ त्याच भाषेत उत्तर द्यायला पाहिजे होते. पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याना का घाबरतात, आपल्याला समजत नाही. किंबहुना गप्प राहण्यासाठी त्याच्यावर वरून दबाव दिसतोय, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथे केली.

दरम्यान, शरद पवार यांना धमकीचा विषय गंभीर आहे. त्यासाठी सरकारने आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. ताबडतोब याची दखल घेऊन अशी धमकी कोठून आली याचाही शोध घेतला पाहिजे. आवश्यक सुरक्षितता देण्याची व्यवस्था केली पाहिजे, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले

सातारा येथे राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, दीपक पवार आदी उपस्थित होते. कर्नाटकची निवडणूक होऊ घातली आहे. तिकडच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राबद्दल हवे तसे बोलणे आणि मराठी माणसांच्या मागे शुक्लकाष्ट लावून देणे हे जे सर्व प्रकार चालले आहेत आणि केंद्र सरकार ते मूकपणाने पहात आहे. तेथील निवडणुकीसाठी तुम्हाला काय दंगा करायचा तो करा. आम्ही महाराष्ट्राला गप्प बसवतो अशातला हा प्रकार असल्याचा हल्लाबोल जयंत पाटील यांनी केला. कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रासंबंधी काहीही बोलत असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शात आहेत. त्यांच्यावर वरून दबाव दिसतोय. जसे गुजरातला उद्योग पळवताना तिथे निवडणुका आहेत, गप्प बसा असे म्हटल्यावर आदेश पाळणारे हे दोघे आहेत. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री काहीही बोलत असुनही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शांत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

एवढा मोठा चार लाख युवकांना रोजगार देणारा प्रकल्प गुजराथला गेला आता आमची मागणी आहे, की तुमचे काम झाले. १५६ जागा निवडून आल्या. त्यामुळे तिकडची व्यवस्था झाली असल्याने आमचा प्रकल्प आम्हाला परत द्या, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली.

रोहित पवारांनी आधी स्वतःचा मतदारसंघ सांभाळावा अशी मल्लिनाथी करणाऱ्या नितेश राणे यांनाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. रोहित पवार अतिशय चांगले काम करत आहेत हे महाराष्ट्राला माहिती आहे. शिवाय त्यांच्या मतदारसंघात त्याची लोकप्रियता उत्तम आहे. मतदारसंघाच्या बाहेर जावूनही ते काम करत आहेत. आज ते बेळगावला गेले. तरूण नेते म्हणून विविध विषय ते हाताळत आहेत याचे आम्हाला समाधान आहे, असे ते म्हणाले.

पाणी अडवा पाणी जिरवा ही आमच्या सरकारचीच जुनी कल्पना आहे. तथापि, जलयुक्त शिवारचे काम पारदर्शी व्हावे. मागच्या जलयुक्त शिवार अंमलबजावणीत अनेक त्रुटी राहिल्या. त्यामुळे कामाच्या बाबतीत आक्षेप झाले तशी गोष्ट होऊ नये अशी आमची अपेक्षा असल्याचे त्यांनी यासंबंधीच्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले.

पत्रकारावर मर्यादा आणण्याचा प्रकार जनतेला आवडणार नाही

ज्या पत्रकारानी अँगलमध्ये फोटो घेतला त्याबद्दलही आक्षेप घेण्यात आला आणि त्या पत्रकाराला दिवसभर बसवून ठेवण्यात आले. झालेल्या घटनेचा वृत्तात जनतेपर्यंत पोहोचवला याचा राग मानून एखाद्या पत्रकाराला डांबून ठेवण्याचे काम महाराष्ट्रात आणि देशात आता लोकशाहीत व्हायला लागले आहे. आम्ही आतापर्यंत ऐकत होतो, की काय छापावे काय नाही, काय दाखवावे काय नाही, या अनुषंगाने चॅनेलवर मर्यादा घातल्या जात आहेत. वर्तमानपत्रावर थोडीशी हुकुमत गाजवण्याची पध्दत आता सुरू झाली आहे. आता तर पत्रकारानी फोटो काढले, त्यांनी बातमी दिली तर त्यावरही मर्यादा आणण्याचे काम सुरू झाले आहे. महाराष्ट्रात व देशात लोकशाहीची बूज राखणाऱ्या जनतेला हा प्रकार अजिबात आवडणार नाही, म्हणून पत्रकारानीही आता आपल्या परीने आपले स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आमच्या या सगळ्या लढ्यात सहभागी झाले पाहिजे असे जयंत पाटील यावेळी म्हणाले. तुम्ही पाहिजे तसे बोलायचे, कशीही वाचाळवीरासारखी कृती करायची आणि पत्रकारांवर बंधने आणायची हे योग्य नाही. पत्रकार शाईचा वापर तुम्ही जे कृत्य करता. त्याचे वर्णन करण्यासाठी करतात. पत्रकारांनी अंगावर शाई फेकल्याचे आपल्याला तरी आठवत नाही, अशी पुस्ती त्यांनी जोडली.