जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला गती मिळण्यासाठी वॉर्डनिहाय समित्या कार्यान्वीत करा
पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश
जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी होत आहे. ही बाब सकारात्मक असून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला गती दिली पाहिजे. यासाठी गाव निहाय व शहरी भागात वॉर्डनिहाय यादी तयार करुन वॉर्ड समित्या कार्यान्वीत करा. यामध्ये लोकप्रतिनिधींचा मोठ्या प्रमाणात सहभाग घ्या, असे निर्देश सहकार व पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले.
सातारा : जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी होत आहे. ही बाब सकारात्मक असून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला गती दिली पाहिजे. यासाठी गाव निहाय व शहरी भागात वॉर्डनिहाय यादी तयार करुन वॉर्ड समित्या कार्यान्वीत करा. यामध्ये लोकप्रतिनिधींचा मोठ्या प्रमाणात सहभाग घ्या, असे निर्देश सहकार व पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात जिल्हा कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे आदी उपस्थित होते.
कोरोना प्रतिबंधक लसीकरणापासून एकही नागरिक वंचित राहणार नाही यासाठी प्रत्येक घरनिहाय सर्व्हेक्षण करा, असे सांगून पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील सर्व्हेक्षणासाठी ग्रामसेवक व आशा सेविका यांची मदत घ्या. मंजुरांच्या लसीकरणासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करावे. यामध्ये सकाळी व संध्याकाळी मजुरांसाठी लसीकरण करण्यात यावे.
मिशन कवच कुंडल मोहिमेंतर्गत जिल्ह्यात आजपर्यंत 99 हजार 33 नागरिकांना लस देण्यात आलेली आहे. जिल्ह्यात 83 टक्के पहिला डोस व 36 टक्के दुसरा डोस झाला आहे. जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी मिशन कवच कुंडल सारखी आणखी एक मोहिम दिवाळीनंतर राबवावी. या मोहिमते विशेषत: महिलांना केंद्रबिंदू ठेवावे. जिल्ह्याला मुबलक प्रमाणात लसींचा पुरवठा होत आहे. तरी नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे येऊन लस घ्यावी, असे आवाहनही पाटील यांनी यावेळी केले.
या बैठकीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांनी प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.