म्हसवड बाजार समितीचा सचिव लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात
गाळा भाड्याने देण्याच्या प्रकरणात मागितली 50 हजाराची लाच
दहिवडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अंतर्गत येणाऱ्या म्हसवड येथील बाजार समितीतर्फे बांधण्यात येणाऱ्या गाळा भाड्याने देण्याच्या प्रक्रिया संदर्भात पन्नास हजाराची लाच घेताना म्हसवड बाजार समितीचा सचिव रमेश रामभाऊ जगदाळे वय 56 राहणार राणंद, तालुका माण याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
सातारा : दहिवडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अंतर्गत येणाऱ्या म्हसवड येथील बाजार समितीतर्फे बांधण्यात येणाऱ्या गाळा भाड्याने देण्याच्या प्रक्रिया संदर्भात पन्नास हजाराची लाच घेताना म्हसवड बाजार समितीचा सचिव रमेश रामभाऊ जगदाळे वय 56 राहणार राणंद, तालुका माण याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे बाजार समितीच्या वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी सायंकाळी साडेचार च्या दरम्यान कार्यालय परिसरातच ही कारवाई करण्यात आली.
याबाबतची अधिक माहिती अशी, दहिवडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत येणाऱ्या म्हसवड बाजार समितीच्या परिसरात नवीन गाळ्यांच्या बांधकामाची प्रक्रिया सुरू आहे. येथील गाळे भाड्याने देण्याच्या प्रक्रिया संदर्भात तक्रारदाराकडे जगदाळे यांनी पन्नास हजार रुपये लाच देण्याची मागणी केली होती. यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांना तक्रार अर्ज प्राप्त झाला. तांत्रिक प्रक्रियेच्या सोपस्कारानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक सुजय गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात सायंकाळी साडेचारच्या दरम्यान सापळा रचला.
जगदाळे याला पन्नास हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईमुळे बाजार समितीच्या कर्मचारी वर्तुळात जोरदार खळबळ उडाली. या प्रकरणी जगदाळे याला रात्री उशिरा ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी सुरू करण्यात आली. या संदर्भात रात्री उशिरापर्यंत म्हसवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद झाली नव्हती.