वडूज पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गेल्या दहा दिवसांपासून वावरणाऱ्या तोतया पोलिसाला वडूज पोलिसांनी शिताफीने पकडले असून त्याची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे.
वडूज : वडूज पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गेल्या दहा दिवसांपासून वावरणाऱ्या तोतया पोलिसाला वडूज पोलिसांनी शिताफीने पकडले असून त्याची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे.
निलेश सुरेश चव्हाण रा. वडगाव हवेली, ता. कराड जि. सातारा असे अटक करण्यात आलेल्या तोतया अधिकाऱ्याचे नाव आहे.
याबाबत पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार दि 22 रोजी वडूज-कराड रस्त्यावर एकजण पोलीस अधिकारी बनून वाहनांची तपासणी करत असल्याची माहिती वडूज पोलिसांना मिळाली. त्यानुसार वडूज पोलीस पडताळणी करण्यासाठी वडूज-कराड रस्त्यावर पोहोचले. यावेळी त्यांनी आपली वाहने अलिकडेच थांबवली व चालत त्या तोतया पोलीस अधिकाऱ्याजवळ पोहोचले. यावेळी वाहनांची तपासणी करणारा अधिकारी त्याची मोटार सायकल क्र. MH 11- AC- 5426 उभी करून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना थांबवण्याचा इशारा करत होता.
पडताळणी करत असलेल्या पोलिसांनी वाहनाची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यास नाव विचारले असता API विशाल संजय पाटील असे त्याने नाव सांगितले. परंतु बाकी लोकांची नेमणूक कोठे आहे, असे विचारले असता मात्र तो चाचपडला. पळण्याचा प्रयत्न करू लागला असता त्याला ताबडतोब ताब्यात घेण्यात आले.
याबाबत पोलिस हवालदार बापू शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास अश्विनी काळभोर करत आहेत.