maharashtra

युक्रेन देशातून पाच विद्यार्थी सुखरूप सातारा जिल्ह्यात दाखल

सातारा येथील दोन विद्यार्थ्यांचा समावेश; आणखी १४ विद्यार्थी लवकरच दाखल होणार

Five students from Ukraine safely admitted to Satara district
युक्रेन देशात सातारा जिल्ह्यातुन वेगवेगळ्या महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या १९ विद्यार्थ्यांपैकी ५ विद्यार्थी आज त्यांच्या घरी सुखरूप परतले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी प्रशासनाचे आभार मानले असून उर्वरित १४ विद्यार्थी लवकरच जिल्ह्यात दाखल होण्याची शक्यता आहे.

सातारा : युक्रेन देशात सातारा जिल्ह्यातुन वेगवेगळ्या महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या १९ विद्यार्थ्यांपैकी ५ विद्यार्थी आज त्यांच्या घरी सुखरूप परतले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी प्रशासनाचे आभार मानले असून उर्वरित १४ विद्यार्थी लवकरच जिल्ह्यात दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज दाखल झालेल्या ५ विद्यार्थ्यांमध्ये सातारा येथील २ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी, युक्रेन देशातील गुंडापेस्ट, हंगेरी, पोलंड, रोमानिया या ठिकाणी असणाऱ्या महाविद्यालयांमध्ये सातारा जिल्ह्यातील विद्यार्थी वैद्यकीय महाविद्यालयीन शिक्षण घेत होते. रशियाने सुमारे आठ दिवसापूर्वी युक्रेन विरुद्ध युद्ध पुकारल्यानंतर रशियन सैनिकांनी युक्रेनची राजधानी कीव मधील आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला करत धावपट्टी उद्ध्वस्त केली होती. रशियन सैनिकांनी युक्रेनमधील इतर विमानतळेही नष्ट केली. त्यातच युक्रेन सरकारने संपूर्ण देशात नो फ्लाय झोन जाहीर केल्यामुळे युक्रेनमधुन विमानाद्वारे बाहेर पडणे मुश्किल झाले होते. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांनी युक्रेन शेजारी असणाऱ्या देशांच्या सीमेवर जाऊन परत भारतात येण्याचा प्रयत्न केला. तसेच तेथील प्रशासन व भारतीय परराष्ट्र मंत्रालयाला आम्हाला येथून घेऊन जावा अशी आर्त हाक दिली. परराष्ट्र मंत्रालयाने गुंडापेस्ट, हंगेरी, पोलंड, रोमानिया येथील प्रशासनाला विनंती करून भारतीय विद्यार्थ्यांना आपल्या शहरात विनाशर्त प्रवेश देण्याची मागणी करत भारतीय विद्यार्थ्यांना परत मायदेशी नेण्यासाठी त्यांच्या हवाई क्षेत्राचा वापर करण्याची मागणी केली होती. ती मागणी मान्य करण्यात आली होती.
दरम्यान, प्रशासनाने युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधत त्यांची संपूर्ण माहिती घेतली होती.  प्रशासन आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रयत्नातून युक्रेन देशातील विविध भागातून साद अमीर शेख, रा. मंगळवार पेठ, कराड, मनोज दादासाहेब कदम, रा. नेरवाडी (नरवणे), ता. माण, कौस्तुभ विनोद पाटील, रा. सैदापूर, ता. कराड, शार्दुल हेमंतकुमार जाधव, रा. केसरकर पेठ, सातारा आणि हर्षवर्धन किशोर शिंदे, रा. पिरवाडी, (खेड), ता. सातारा हे एअर इंडियाच्या खास विमानाने काल रात्री भारतात दाखल झाले. आज सायंकाळी ४ वाजेपर्यंत हे पाचही विद्यार्थी आपापल्या घरी सुखरूप पोहोचले आहेत. युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या अन्य १४ विद्यार्थ्यांना सातारा जिल्ह्यात सुखरुप आणण्यासाठी प्रशासन व परराष्ट्र मंत्रालयाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून लवकरच ते सातारा जिल्ह्यात दाखल होतील, असे सांगण्यात येत आहे.