maharashtra

मतिमंद मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकास 10 वर्षे कारावास आणि 5 हजार रुपये दंड


मतिमंद मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकास न्यायालयाने 10 वर्षे कारावास आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

उंब्रज : मतिमंद मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकास न्यायालयाने 10 वर्षे कारावास आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उंब्रज पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात दिनांक 19 मे 2020 रोजी सकाळी 11.00ते 11.30 वाजण्याच्या सुमारास एका मतिमंद 28 वर्षीय मुलीस उचलून नेऊन उसात तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याबद्दल उंब्रज पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक मोहन तलवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय देवकुळे यांनी कसोशीने करून आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले होते. यानंतर या गुन्ह्याचा परिपूर्ण तपास करून आरोपी विरुद्ध सबळ पुरावे न्यायालयात सादर  करून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
हा खटला अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती होरे यांच्या न्यायालयात चालला होता. जिल्हा सरकारी वकील आर. सी. शहा यांनी खटल्याचे कामकाज पाहिले. या खटल्यात 8 साक्षीदार तपासण्यात आले होते. साक्षीदार, पंचांच्या साक्षी व परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरून आरोपी तानाजी विष्णू निकाळजे वय 35, रा. कोर्टी, तालुका कराड यास न्यायालयाने 10 वर्षे करावास व 5 हजार रुपये  दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या खटल्यात पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश कार्वेकर पैरवी अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद पाटील यांनी योग्य ती मदत केली.