maharashtra

भित्तीचित्र उद्घाटन प्रकरणी साताऱ्यात अकराजण ताब्यात


Eleven arrested in Satara in graffiti inauguration case
सातारा शहरातील राजवाडा बसस्थानकात उभारण्यात आलेल्या भिंतीशिल्पाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या परवानगी शिवाय केल्याप्रकरणी पुण्याचे मिलिंद एकबोटे आणि सातारा नगरपालिकेचे नगरसेवक विजय काटवटे यांच्यासह पंचवीस ते तीसजणांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : सातारा शहरातील राजवाडा बसस्थानकात उभारण्यात आलेल्या भिंतीशिल्पाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या परवानगी शिवाय केल्याप्रकरणी पुण्याचे मिलिंद एकबोटे आणि सातारा नगरपालिकेचे नगरसेवक विजय काटवटे यांच्यासह पंचवीस ते तीसजणांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सोमवारी रात्री हा प्रकार घडला. दरम्यान, या घटनेनंतर शाहूपुरी पोलिसांनी एकबोटे आणि काटवटे यांच्यासह ११ जणांना रात्री उशिरा ताब्यात घेतले होते.
याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, सातारा आगाराच्या डेपो मॅनेजर रेश्मा शंकर गाडेकर (वय ३७, रा. ३२४, बाबर कॉलनी, करंजे, सातारा) यांनी तक्रार दिली असून त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, साताऱ्यातील राजवाडा बसस्थानकात उभारण्यात आलेल्या भिंतीचित्राचे उद्घाटन करण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र, सातारा नगरपालिकेचे विजयकुमार अजित काटवटे (रा. ३४४, रामाचा गोट, सातारा), शहाजी बुवा रामदासजी (रा. सज्जनगड, सातारा), मिलींद रमाकांत एकबोटे (रा. शिवाजीनगर, पुणे), संकेत विजयकुमार शिंदे (रा. पिलेश्वरीनगर, करंजे, सातारा), सूरज सोमनाथ भगत (रा. वडकी, ता. हवेली, जि. पुणे) आणि इतर २५ ते ३0 जणांनी जमाव जमवून या सर्वांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले आणि भिंतीचित्रावरील झाकण्यात आलेली ताडपत्री फाडून काढून त्याचे नुकसान केले.
साताऱ्यातील राजवाडा बसस्थानक आवारात जे शिल्प उभारण्यात आले आहे, त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांच्या भेटीचे एक शिल्प आहे. ऐतिहासिकदृष्ट्या ते चुकीचे असून छत्रपतींची राजधानी असलेल्या शहरात चुकीचा इतिहास लोकांसमोर जाणे चुकीचे आहे, असा आक्षेप घेत 'छावा क्षात्रवीर सेना' संघटनेच्या वतीने तक्रार केली होती. दरम्यान, हे शिल्प कलात्मदृष्ट्या योग्य असल्याचे सांगत राज्याच्या कला संचालनालयाने मान्यता दिली आहे. मात्र, आमचा आक्षेप कलेबाबत नसून या शिल्पातून मांडण्यात आलेल्या इतिहासाबाबत आहे, असे 'छावा क्षात्रवीर सेना' संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे इतिहासात्मक अभ्यास करूनच या शिल्पाबाबत अभिप्राय घेण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. तसेच तोपर्यंत या शिल्पाच्या उद्घाटनाला परवानगी देण्यात येऊ नये आणि तसे उद्घाटन करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणीही जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती.
दरम्यान, या अनुषंगाने वादंग सुरु झाले असतानाच विजय काटवटे आणि मिलींद एकबोटे यांच्यासह पंचवीस ते तीसजणांनी भिंतीचित्रावरील ताडपत्री सोमवारी रात्री फाडून टाकली असल्याची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, सहायक पोलीस अधीक्षक आंचल दलाल तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. अन्य पोलीस अधिकारी व कर्मचारी सोबत होते. संबंधितांनी एसटी महामंडळाची परवानगी न घेता उदघाटन करण्याचा प्रयत्न केला म्हणून पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले होते. सोमवारी रात्री उशिरा या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले.