राज्यातील महसूल विभागात कारकून पदे तत्काळ भरावीत तसेच नायब तहसीलदारांच्या बाबतीत नवीन काढलेला आदेश शासनाने रद्द करावा, या प्रमुख मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
सातारा : राज्यातील महसूल विभागात कारकून पदे तत्काळ भरावीत तसेच नायब तहसीलदारांच्या बाबतीत नवीन काढलेला आदेश शासनाने रद्द करावा, या प्रमुख मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. दरम्यान शासनाने महसूल कर्मचाऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात आणि हा संप जनतेच्या हितासाठी मिटवावा, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
महसूल कर्मचारी मागील आठवड्यापासून बेमुदत संपावर गेले आहेत. मंत्रालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली परंतु ती निष्फळ ठरली. शासनाने कोणत्याच मागण्या मान्य केल्या नसल्यामुळे हसूल कर्मचार्यांनी संप पुढेही चालू ठेवला आहे. सोमवारी सर्व कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयात ३५० कर्मचारी एकत्रित आले होते. त्यांनी आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली तसेच नियोजन भवनामध्ये आमसभा घेऊन मागण्यांबाबत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
महसूल सहायकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असून एका महसूल सहायकाकडे दोन ते तीन संकलनाचा अतिरिक्त कार्यभार आहे, त्यामुळे कर्मचारी प्रचंड तणावात असून महसूल सहायक भरतीसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनदेखील भरती करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. अव्वल कारकून, मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नतीचे प्रस्ताव मंत्रालयात दीड ते दोन वर्षांपासून प्रलंबित असल्याचे दिसून येते. शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक दहा मे २०२१ अन्वये नायब तहसीलदार संवर्ग हा राज्यस्तरीय संवर्ग म्हणून घोषित करण्यात आलेला आहे व त्यानुसार सर्व अव्वल कारकून व मंडल अधिकारी यांच्या सेवा ज्येष्ठता याद्या राज्यस्तरावर एकत्रित करण्याबाबत शासनाने पत्र काढले आहे. परंतु, अव्वल कारकून व मंडळ अधिकारी हा जिल्हास्तरीय संवर्ग असल्यामुळे त्यांच्या याद्या राज्यस्तरावर एकत्रित करण्याची प्रक्रिया ही अन्याय करत असल्याने हे पत्र तत्काळ रद्द करण्यात यावे.