महाबळेश्वर - पोलादपूर रस्त्याला अजून किती दिवस गोंजारणार?
पर्यटक, स्थानिक व्यावसायिक आणि प्रवाशांचा प्रशासनाला सवाल
महाबळेश्वर-पोलादपूर रस्ता हा जिल्ह्यातील एक महत्त्वाचा मार्ग म्हणून ओळखला जातो. असे असतानाही या रस्त्याची डागडुजी व देखभाल-दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याकडून अक्षम्य बेजबाबदारपणा केल्याचे दिसून येत आहे. परिणामी संबंधित अभियंत्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी येथील पर्यटक, स्थानिक व्यावसायिक आणि प्रवाशांमधून होत आहे.
सातारा : महाबळेश्वर-पोलादपूर रस्ता हा जिल्ह्यातील एक महत्त्वाचा मार्ग म्हणून ओळखला जातो. असे असतानाही या रस्त्याची डागडुजी व देखभाल-दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याकडून अक्षम्य बेजबाबदारपणा केल्याचे दिसून येत आहे. परिणामी संबंधित अभियंत्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी येथील पर्यटक, स्थानिक व्यावसायिक आणि प्रवाशांमधून होत आहे.
राज्यात ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणचे घाटरस्ते खचले, वाहून गेले. त्याच दरम्यान महाबळेश्वर-पोलादपूर हा राज्य महामार्ग क्र. 72 ही जवळपास वाहून गेला होता. त्यामुळे या रस्त्याची आपत्कालीन परिस्थितीत डागडुजी व देखभाल होणे गरजेचे होते. त्यास अनुसरुन आपत्कालीन निधीतून या रस्त्याचे काम करण्याचे योजले होते. त्यानुसार या रस्त्याचे काम एका ठेकेदारास देण्यात आले. मात्र ‘राजा बोले, दल हाले’ या उक्तीप्रमाणे सुरु असणार्या या कामावर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांचे कोणत्याही प्रकारचे लक्ष नव्हते आणि नाही. या रस्त्याचे बांधकाम सुमारे तीन महिने उलटून गेले तरीही अजून कासवाच्या गतीनेच सुरु आहे. अभियंत्यांच्या या गलथानपणाचा फटका मात्र येथील पर्यटनावर होत आहे.
हा रस्ता कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रास जोडणार्या प्रमुख मार्गांपैकी एक असून या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात महाबळेश्वर, प्रतापगड, महाड या ठिकाणी पर्यटक येत असतात. या रस्त्याचे सुरु असलेले काम अतिशय मंद गतीने व बेजाबदारपणे सुरु आहे. या महामार्गावर अनेक हॉटेल व्यासायिक तसेच पर्यटनावर अवलंबून असलेले अनेक उद्योग सुरु असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ लागली आहे. तरीही या रस्त्याचे ठेकेदार आणि अभियंत्यांचे कामाकडे दुर्लक्ष करीत येणार्या जाणार्या पर्यटक, प्रवासी तसेच स्थानिक नागरिकांच्या जीवाशी खेळणे सुरु आहे. अशा परिस्थितीत एखादी दुर्घटना झाल्यास त्यास संपूर्णतः सार्वजनिक बांधकाम खाते व संबंधित अभियंता जबाबदार असतील, अशी संतप्त प्रतिक्रिया येथील स्थानिक लोक देत आहे. बेजबाबदार आणि ढिसाळ कामाचे नियोजन याचे ज्वलंत उदाहरण म्हणून या रस्त्याकडे पहावे लागेल.
तसे पाहता आपत्काल निधी चा वापर करून लवकरात लवकर हा महामार्ग दुरुस्त करणे अपेक्षित होते. परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग अतिशय नाकर्तेपणा तसेच उदासीनपणाने हे काम करत असताना दिसून येत आहे. दुरुस्ती काम करणार्या अभियंत्यांनी काही ठिकाणी एकमार्गी रस्ता बनवून याठिकाणी कामावर देखरेखीसाठी अभियंता आहेत कि नाही, यावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. आज जवळपास 3 महिने उलटून वाहून गेलेल्या रस्त्याचे भाग तसेच दरडीसुद्धा दूर करण्यास ठेकेदारांना जमलेले नाही, कामाच्या या दिरंगाईबाबत पूर्णपणे सार्वजनिक बांधकाम खात्याचा अभियंता जबाबदार आहे, जे अशा स्वरूपाच्या काम करणार्या ठेकेदाराला पाठीशी घालत धीम्या गतीने काम करून घेत आहेत. अशा या अभियंत्यांना बडतर्फ करा, अशी मागणी येथील पर्यटक, स्थानिक व्यावसायिक आणि प्रवाशांमधून होत आहे.