maharashtra

कराड तालुक्यात बालविवाह मुक्त भारत अभियानास उत्स्फुर्त प्रतिसाद

कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाऊंडेशनच्या उपक्रमात ज्ञानदीप संस्थेचा पुढाकार; 36 ठिकाणी राबविले जनजागृती कार्यक्रम

कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाऊंडेशन नवी दिल्ली याच्या वतीने भारतभर सुरू केलेले बालविवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेच्यावतीने कॅण्डल रॅलीसह विविध उपक्रमांद्वारे सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातील 36 गावात जनजागृती करण्यात आली. या अभियानात उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.

कराड : कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाऊंडेशन नवी दिल्ली याच्या वतीने भारतभर सुरू केलेले बालविवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेच्यावतीने कॅण्डल रॅलीसह विविध उपक्रमांद्वारे सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातील 36 गावात जनजागृती करण्यात आली. या अभियानात उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.
नोबेल शांती पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांच्या पुढाकाराने संपूर्ण देशभरात बालविवाह मुक्त भारत अभियान राबविण्यात येत आहे. संपूर्ण देशात बालविवाह प्रथा नष्ट व्हावी या हेतूने हे अभियान सुरू केले आहे. या अभियानात ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेने सहभागी होत कॅण्डल रॅलीसह विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. कराड तालुक्यात महाविद्यालय परिसरासह वाडीवस्तीपासून विविध गावांमध्ये हे अभियान राबविले.
यामध्ये उमेद अभियानातर्गंत असणाऱ्या महिला बचत गटातील महिला, एकात्मिक बालविकास प्रकल्पातर्गंत असणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा स्वंयसेविका, विविध महिला मंडळे, महाविद्यालयीन युवक व युवती, यशवंतराव चव्हाण स्कुल ऑफ सोशल वर्कचे विद्यार्थी, ज्ञानदीप कौशल्य विकास संस्थेचे विद्यार्थी, कराड शहर पोलीस ठाण्याच्या निर्भया पथक, आगाशिवनगर येथील कचरावेचक महिला, शिक्षक आदींनी सहभाग नोंदविला.
ज्ञानदीप सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंदा थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली निकीता भंडारे, कोमल घोरपडे, समाजशास्त्रज्ञ सुरज मस्के, संस्थेचे अभियंता योगेश खराडे, शांताराम मदने, मधुराणी थोरात, मृणाल गरुड, रुपाली कदम, वैशाली पाटील, उज्वला देसाई, शिरोमणी नांगरे आदी टीमने 36 ठिकाणी हे अभियान राबविले. कराड तालुक्यातीलआगाशिवनगर झोपडपट्टी, विद्यानगर, कार्वे गोपाळवस्ती, महाविद्यालये, अंगणवाडी, प्राथमिक शाळां, महिला बचत गट आदींसह विविध समुहामध्ये जावून कॅन्डल मार्च रॅली व घोषवाक्ये या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. बालविवाह प्रथा करूया नष्ट, पहिले पढाई, फिर बधाई, चलो अब शुरुवात करे, बालविवाह को नष्ट करे असे नारे देत प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यात आली. बालविवाह बाबतच्या कायद्याची अंमलबजावणी व महत्त्व पालकांना पटवून देण्यात आले. महिलांनी गावागावात मेणबत्ती पेटवून व दिपप्रज्वलन करून हा लढा यशस्वी करण्यासाठी निर्धार केला. सर्व महिलांनी या प्रथेला हद्दपार करण्याची शपथ घेतली. यावेळी महिलांनी प्रेरणा गीते सादर केली. रॅलीची सांगता भारत बाल विवाह मुक्त बनावा ही शपथ सर्व पालकांना देऊन करण्यात आली.
आनंदा थोरात म्हणाले, बालविवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत आपल्या गावामध्ये बालविवाह होऊ न देणे प्रत्येकाची जबाबदारी असून यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. कायद्यानुसार लग्न लागायच्या वेळी जर वधू किंवा वर यांच्या पैकी कोणाचेही वय कायद्याला मान्य असलेल्या वयापेक्षा कमी असेल तर बालविवाह ठरतो. तसेच बालविवाह हा कायद्याने गुन्हा असून कायद्याचे उल्लंघन केल्यास पालक व आयोजक तसेच वधू यांना कायदेशीर कारवाई होते. परंतु समाजामध्ये बालविवाह चोरून लावले जातात. त्याचबरोबर मुलीचे आरोग्य, शिक्षण ह्या सर्व गोष्टीला भविष्यात मुकावे लागते, त्यामुळे बालविवाह रोखणे ही काळाची गरज आहे. बालविवाहामुळे घटस्फोट, बालमृत्यू, गरोदर माता मृत्यू याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणून गावापासूनच सुरुवात केली पाहिजे. ग्रामपंचायत, पालक व गाव बालकल्याण समिती यांनी हे रोखण्यासाठी मदत केली पाहिजे.