maharashtra

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी स्वाभिमानी भर उन्हात रस्त्यावर

सातारा जिल्ह्यात चार ठिकाणी चक्काजाम, वाहतुकीची कोंडी

शेतकऱ्यांना येणाऱ्या अडी-अडचणीच्या संदर्भात सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनी दुर्लक्ष केले आहे. याच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाचे आवाहन केले होते. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील सातारा, कराड, फलटण, वडूज, कोरेगाव अशा पाच ठिकाणी जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

सातारा : शेतकऱ्यांना येणाऱ्या अडी-अडचणीच्या संदर्भात सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनी दुर्लक्ष केले आहे. याच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाचे आवाहन केले होते. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील सातारा, कराड, फलटण, वडूज, कोरेगाव अशा पाच ठिकाणी जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले. बॉम्बे रेस्टॉरंट चौकात स्वाभिमानी आंदोलकांनी सुमारे 25 मिनिटे महामार्ग रोखून धरल्याने येथे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यव्यापी आंदोलनाचे आवाहन केले होते. महावितरणाने बेकायदेशीर शेती पंपाची वीज बिल वसुली मोहीम थांबवावी, तोडलेले कनेक्शन तत्काळ जोडून द्यावे, शेतकऱ्यांना दिवसा 12 तास लाईट उपलब्ध व्हावी, वीज दरवाढीचा प्रस्ताव रद्द व्हावा, पंधरा दिवसात ऊस बिल न देणाऱ्या कारखान्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी, टोळी मुकादम कडून वाहतूकदार शेतकऱ्यांची फसवणूक झाली असून त्यावर शासन स्तरावर निर्णय होऊन सर्व ऊस वाहतूकदारांना न्याय द्यावा, सर्व वजन काटे ऑनलाइन करावेत, 50 हजाराचे प्रोत्साहनपर अनुदान तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, इत्यादी मागण्यासाठी हे चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते.
साताऱ्यात जिल्हाध्यक्ष राजू शेळके, अर्जुन भाऊ साळुंखे, कराड येथे पाचवड फाट्यावर पक्षाध्यक्ष देवानंद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब यादव, वडूज येथे राज्यप्रमुख अनिल पवार, युवा जिल्हाध्यक्ष तानाजी देशमुख यांनी, फलटण येथे धनंजय महामुलकर व नितीन यादव यांनी कोरेगाव येथे पाच पथकामध्ये चक्काजाम आंदोलन केले.
बॉम्बे रेस्टॉरंट चौकामध्ये राजू शेळके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वीस मिनिटे पुणे-बेंगलोर महामार्ग रोखून धरला. आंदोलकांनी भर रस्त्यात बसकण मारून राज्य शासनाचा निषेध केला. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या. सुमारे 25 मिनिटे हे आंदोलन सुरू राहिल्याने रस्त्याच्या येणाऱ्या-जाणाऱ्या दोन्ही मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलन इशाऱ्यामुळे पोलीस यंत्रणाही सतर्क झाली होती. सातारा पोलिसांनी  बॉम्बे रेस्टॉरंट चौकात कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. आंदोलनानंतर पोलिसांनी स्वाभिमानीच्या सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले. जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी आमचे आंदोलन हे कायद्याला अधीन राहून असल्याने कोणतीही अडचण येणार नाही, असे बोलताना सांगितले. सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, सातारा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घोडके यांच्या नेतृत्वात पोलीस बंदोबस्त तैनात होता.