maharashtra

कास महोत्सवासारखे स्टार्टअप पर्यटनासाठी संजीवनी ठरतील

वॉटर स्पोर्ट्स सह अन्य सुविधा देण्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचे आश्वासन

कास पठाराला युनेस्कोने वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. तरीपण येथील पर्यटन वृद्धीसाठी आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी येथे पर्यटक येणे गरजेचे आहे. पर्यटकांना सुविधा मिळणे गरजेचे असून छोट्या-मोठ्या उद्योगांचे स्टार्टअप हीच पर्यटनाची संजीवनी आहे.

सातारा : कास पठाराला युनेस्कोने वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. तरीपण येथील पर्यटन वृद्धीसाठी आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी येथे पर्यटक येणे गरजेचे आहे. पर्यटकांना सुविधा मिळणे गरजेचे असून छोट्या-मोठ्या उद्योगांचे स्टार्टअप हीच पर्यटनाची संजीवनी आहे. पर्यावरण पूरक पायाभूत सुविधा उभ्या करून कास महोत्सवासारखे उपक्रम वारंवार राबवले गेल्यास येथील पर्यटन वृद्धीला निश्चित संजीवनी मिळेल, अशी अपेक्षा खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली.
त्याकरिता सी प्लेन, वॉटर स्पोर्ट यासारख्या सुविधा विविंग गॅलरी, बोटिंग अशा विविध माध्यमातून स्थानिकांच्या रोजगार निर्मितीला प्राधान्य देणे शक्य आहे व त्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट आश्वासन उदयनराजे यांनी बोलताना दिले.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालय आणि वनविभाग यांच्या सहकार्याने आयोजित तीन दिवसीय कास महोत्सवाचे उद्घाटन आटाळी गावच्या हद्दीतील भव्य सभा मंडपात झाले. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, यावेळी उपवनसंरक्षक महादेव मोहिते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण  हरिश्चंद्र वाघमोडे, उपसंचालक वन्यजीव उत्तम सावंत, पर्यटन संचालनालयाचे उप अभियंता शांताराम पुजारी, ज्येष्ठ अभिनेते मिलिंद इंगळे, अभिनेते किशोर कदम, माजी शिक्षण सभापती सुनील काटकर पंकज चव्हाण इत्यादी यावेळी उपस्थित होते.
उदयनराजे पुढे म्हणाले, महाबळेश्वर, पाचगणी, कास, पाटण हा सर्व भाग सह्याद्रीच्या एकाच रांगांमध्ये येतो. येथील नागरिकांनी रोजगार निर्मिती होत नसल्याने पुणे मुंबई यासारख्या मोठ्या शहरांमध्ये जाऊन आपले शून्यातून विश्व निर्माण केले. पण काससारख्या डोंगरी भागांमध्ये निसर्ग सौंदर्य भरपूर असताना पर्यटन आणि रोजगार यामध्ये अजिबात वाढ झाली नाही. त्यामुळे या भागात पर्यावरणपूरक अशा सोयी सुविधा निर्माण करणे आणि स्थानिकांना रोजगार निर्माण करून देणे यासारख्या कल्पनांना चालना देण्यासाठी कास महोत्सव ही एक सुवर्णसंधी आहे. येथे ग्रामोद्योग प्रदर्शन खाद्यान्न प्रदर्शन तसेच होऊ द्या हवा सारखे मनोरंजनात्मक कार्यक्रम कास पठारावरील फुलणाऱ्या फुलांचे प्रदर्शन अशा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून कास पठारावर येणाऱ्या पर्यटकांचे मनोरंजन होणार असून त्यांना निसर्गाचा आस्वाद घेणे शक्य होणार आहे. कास परिसराच्या पायाभूत सुविधा आणि रोजगारांसाठी कास परिसरात वॉटर स्पोर्ट्स विकसित करण्याचे नियोजन केंद्र शासनाच्या सहकार्याने केले जाणार आहे. त्याकरता केंद्र व राज्य यांचा संयुक्त निधीतून हे करणे शक्य होणार आहे. परराज्यातील नागरिकांना कास पठारावर येण्यासाठी थेट सी प्लेन सुविधा सुरू करता येईल काय, याकरता केंद्रीय नागरी विमान उड्डाणमंत्र्यांशी सुद्धा चर्चा सुरू असल्याचे उदयनराजे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी म्हणाले, कास परिसरातील नागरिकांना आपली संस्कृती आपली ग्रामरचना तसेच आपल्या परंपरा कास महोत्सवाच्या माध्यमातून करणे शक्य आहे. यातून होणारी रोजगार निर्मिती येथील पर्यटनाला चांगली चालना देऊ शकते. त्यामुळे पर्यटकांनी या कास महोत्सवाचा निश्चित लाभ घ्यावा, असे आवाहन जयवंशी यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यानंतर दीप प्रज्वलनाने झाली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांनी खासदार उदयनराजे भोसले व अभिनेते मिलिंद इंगळे किशोर कदम यांचा विशेष सत्कार करण्यात आला. उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी प्रास्ताविक केले. दीप्ती भागवत यांनी सूत्रसंचालन केले. कास महोत्सवाच्या पहिल्या दिवशी महोत्सवातील विविध कार्यक्रमांचा पठारावर आलेल्या पर्यटकांनी आनंद लुटला. या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री शंभूराजे देसाई व पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते होणार होते. मात्र ऐनवेळी तांत्रिक कारणास्तव त्यांच्या हस्ते होणारे उद्घाटन रद्द झाल्याने या महोत्सवाची उलट-सुलट चर्चा सुरू झाली होती.