maharashtra

जातीय तेढ निर्माण करण्याचा भाजप चा प्रयत्न : आ. पृथ्वीराज चव्हाण


सध्या देशात भाजप विरोधात वातावरण आहे. पण त्याचा फायदा घेण्यासाठी विरोधकांची एकजूट तितकीच गरजेची आहे, अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री तथा आ. चव्हाण यांनी व्यक्त केली.

सातारा : राम मंदिर जरी बांधून झाले असले तरी त्याचा येणार्‍या लोकसभा निवडणुकीत मतासाठी फायदा होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाटत नाही. म्हणूनच जातीय तेढ निर्माण करण्याचा भाजप वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करीत आहे. सध्या देशात भाजप विरोधात वातावरण आहे. पण त्याचा फायदा घेण्यासाठी विरोधकांची एकजूट तितकीच गरजेची आहे, अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री तथा आ. चव्हाण यांनी व्यक्त केली.
आमदार चव्हाण यांनी त्यांच्या निवासस्थानी दिवाळीनिमित्ताने फराळाचे आयोजन केले होते. त्यावेळी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना ते बोलत होते. चव्हाण म्हणाले, दिवाळीनिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार भेटले. पण पवारांचे घरातल्या घरात नेमके काय चालू आहे, हे समजत नाही. त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत विश्‍लेषण करणारा अजून जन्माला यायचा आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना ते म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला दिलेले आरक्षण हे व्यवहारिकदृष्ट्या योग्य होते; पण पुढे आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला ते टिकवता आले नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले पाहिजे. त्यांच्यासमोर त्यासंदर्भातील योग्य मांडणी केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.
लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात ते म्हणाले, अजून आमच्या आघाडीत कोण कोणती जागा लढवणार, हे निश्चित नाही. ते बैठक घेवून पहिल्यांदा ठरले पाहिजे. महाविकास आघाडी जो निर्णय होईल त्यावर माझी पुढील दिशा ठरेल.