maharashtra

ट्रॅक्टर ऊस वाहतूक ठरतेय जीवघेणी


Tractor cane transport is fatal
रस्त्याचे काम चालू असल्यामुळे कोरेगाव-पुसेगाव रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडी पहावयास मिळत आहे. त्यातच सध्या ऊसाचा गळीत हंगाम सुरु झाल्यामुळे ऊस वाहतूकसुध्दा मोठ्या प्रमाणावर होत आहे. या ऊसाची वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर ट्रॉलींच्या पाठीमागे लाईट, रिफलेक्टर नसल्याने मोठे अपघात होत आहेत.

पुसेगाव : गेल्या चार ते पाच वर्षापासून सातारा-पंढरपूर रस्त्याचे काम चालू आहे. पुसेगाव ते कोरेगाव या पट्ट्यात मोठया प्रमाणावर वाहतूक होत असते. रस्त्याचे काम चालू असल्यामुळे कोरेगाव-पुसेगाव रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडी पहावयास मिळत आहे. त्यातच सध्या ऊसाचा गळीत हंगाम सुरु झाल्यामुळे ऊस वाहतूकसुध्दा मोठ्या प्रमाणावर होत आहे. या ऊसाची वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर ट्रॉलींच्या पाठीमागे लाईट, रिफलेक्टर नसल्याने मोठे अपघात होत आहेत. यामध्ये वाहनचालक जखमी होण्याचे प्रमाण वाढत आहे. विशेषकरुन रात्रीचा प्रवास धोकादायक ठरत आहे. त्यामुळे ट्रॅक्टर ट्रॉलींना रिफ्लेक्टर लावण्याची सक्ती करावी अशी मागणी परिसरातील नागरीकांकडून व वाहनधारकांकडून होताना दिसत आहे.
ऊस गळीत हंगामामुळे पुसेगाव-कोरेगावमधून तसेच अनेक ग्रामीण मार्गावरुन डबल ट्रॉलीच्या माध्यमातून ऊस वाहतूक होत असते. या वाहतूकीच्या रस्त्यांवर मोठे खड्डे पडलेले असल्याने ट्रॉली पलटण्याची भिती असते. त्यामुळे वाहनधारकांना डबल ट्रॉली ओव्हरटेक करताना जीव मुठीत धरून आपले वाहन चालवावे लागत आहे. मागील वर्षी अशाप्रकारे ओव्हरटेक करताना अनेक अपघात घडले आहेत. त्यामध्ये अनेकांना आपला जीवदेखील गमवावा लागला आहे. किरकोळ जखमी असणारांचाही संख्या लक्षणीय होती.
या विभागात ऊसाची वाहतूक मुख्यत्वेकरुन सिंगल ट्रॉली, डबल ट्रॉली व जुगाड ट्रॅक्टर आदी वाहनातून केली जाते. ऊस वाहतूक करताना ट्रॅक्टर चालकांकडून वाहतुकीचे नियम पाळले जात नसल्याचे पहायला मिळत आहे. या वाहनांना रिफ्लेक्टर नसणे, इंडिकेटर नसणे, चालक प्रशिक्षित नसणे, परवाना नसणे, नादुरुस्त वाहने रस्त्यावर अस्ताव्यस्त लावणे इ. कारणांमुळे अपघात घडल्याचे अपघातानंतर निदर्शनास आले आहे.      
अनेक ट्रॅक्टर चालकांकडून फक्त एकाच हेड लाईटचा वापर केला जातो. त्यामुळे समोरून येणार्‍या वाहनधारकाची फसगत होते. वाहनचालक समोरून मोटार सायकल येत आहे या अंदाजाने वाहन चालवत असतात पण जवळ आल्यावर ऊस वाहतूक करणारे वाहन म्हणजे ट्रॅक्टर आहे हे वाहनचालकाच्या लक्षात येते. त्यामुळे समोरून येणारे वाहन ट्रॅक्टवर आदळण्याचे प्रमाण वाढत आहे. तर दुसरीकडे बर्‍याच सिंगल व डबल ट्रॅक्टरच्या मागे ब्रेकलाईट नसल्याचेही निदर्शनास येत आहे. त्यामुळे फक्त रिफ्लेक्टरच्या अंदाजाने वाहन चालवावे लागते. तसेच काही ट्रॅक्टर ट्रॉलींना जुनेच रिफलेक्टर असल्याने ते खराब झाले आहेत. ट्रॅक्टरच्या मागे एक लाईट असावा अशी सूचना ट्रॅफीक पोलीसांकडून दरवर्षी केली जात असताना ट्रॅक्टर चालकांचे या गोष्टीकडे दुर्लक्ष होत असल्याचे आढळून येत आहे. या सर्व बाबींची गंभीर दखल घेऊन आरटीओ विभागानेही ट्रॅक्टर चालकांना ट्रॉलीच्या मागे लाईट लावण्याबाबत पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून प्रत्येक वर्षी सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. त्या कालावधीत सदर कार्यालयाकडून साखर कारखान्यांवर जाऊन ट्रॅक्टर, ट्रेलरला रेडीयम पट्ट्या लावून हा सप्ताह साजरा केला जातो. यामध्ये आणखी प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने या बाबींकडे सुरक्षेच्या दृष्टीने गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. याबाबत योग्य ती कार्यवाही संबंधीत विभागाकडून तातडीने व्हावी, अशी अपेक्षा परिसरातील नागरीक व्यक्त करताना दिसत आहेत.