कराड येथील दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून शरद पवार यांचा रोखठोक इशारा
कराड : देशातील सर्वसामान्य माणसाचा लोकशाहीचा अधिकार काढून घेणे आणि जातीय दंगली घडवण्याचे काम सुरू आहे. राज्यात देखील अशाच प्रकारची यंत्रणा कार्यरत आहे. त्यांना पुढील सहा महिन्यात येणाऱ्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊ, असा रोखठोक इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. महाराष्ट्राला प्रगती कडे घेऊन जाण्यासाठी नवी पिढी तयार करणे आवश्यक असून त्याला युवाशक्तीचा हातभार लागणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कराड येथील दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून त्यांनी पक्षाची नवीन भूमिका स्पष्ट केली. त्याचबरोबर आगामी कालावधीमध्ये कोणत्या पद्धतीने पुढे जाणे आवश्यक आहे याबाबतही कार्यकर्त्यांना खास मार्गदर्शन केले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, प्रभाकर देशमुख, मानसिंगराव देशमुख, अरुण लाड, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, अनिल देशमुख, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार, रोहित पाटील, प्रतीक पाटील उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, जात धर्म पंथ या माध्यमातून माणसांमध्ये संघर्ष कसा वाढत जाईल यासाठी प्रयत्न करणारा एक वर्ग तयार होतो आहे. शाहूंचे कोल्हापूर असेल, नांदेड, सांगोला, अकोला या ठिकाणी लोकांमध्ये वैरभावना निर्माण करून ती वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. यातून जातीय दंगे झाले. समाजविघातक प्रवृत्ती उभ्या राहत असताना त्यांना रोखण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस हे काम करत आहे. मात्र त्यालाही अडथळा आणण्याचा या प्रयत्न शक्तींकडून होत आहे. शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून सरकार एकत्रितपणे चालवण्याचं काम केलं. मात्र हे सरकार देखील काढून टाकण्याचं काम या विघातक शक्तीने केले.
देशात देखील अशीच परिस्थिती निर्माण असून मध्य प्रदेश येथे कमलनाथ यांचे सरकार देखील अशाच पद्धतीने पाडण्यात आले. देशात दिल्ली, पंजाब, उत्तराखंड या ठिकाणी देखील अशीच परिस्थिती निर्माण केली जात आहे. सध्या संकटाचा काळ आहे. पण यातूनही बाहेर पडण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आणि प्रवृत्तीला थांबवले पाहिजे. महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर यांचा आहे. लोकशाहीत काम करणाऱ्या कामगारांचा आहे. या ठिकाणी जातीयवादी विचारधारा कधीच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न होणार नाही. यासाठी ही नवीन पिढी जातीय वाद्यांना काढण्याचे काम करेल. दुर्दैवाने आपले काही सहकारी या जातीयवाद्यांसोबत जात आहेत. मात्र लवकरच त्यांना त्यांची जागा देखील कळेल. यासाठी सर्वसामानिक शक्ती मजबूत करून आपण लढा उभारला पाहिजे. सर्वांच्या हिताचे कष्टकऱ्यांचे आणि महाराष्ट्राला घेऊन पुढे घेऊन जाणारे राज्य निर्माण करायचे आहे. पुढच्या काळामध्ये तरुणाईला या लढ्यास सहभागी होणे आवश्यक आहे.
प्रीती संगमावर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शरद पवार यांच्या जय घोषणाच्या घोषणा दिल्या जात होत्या. यावेळी शरद पवारांनी सर्वांना शांत करत शांत बसा, कोणी बोलू नका आता फक्त आवाज माझाच, असे बोलल्याने सर्वत्र शांतता पसरली. मात्र त्यातून त्यांना नेमका काय संदेश द्यायचा हे देखील सर्वांना कळले. यशवंतराव चव्हाण हे तुमचे आमचे सर्वांचे गुरु आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात काम आपल्याला पुढील काळात करायचे आहे, अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली. यशवंतरावांचा आशीर्वाद घेऊनच आम्ही पुढे एल्गार मोर्चा नेणार आहोत. यासाठी त्यांना वंदन करूनच महाराष्ट्राच्या नवीन कामाला सुरुवात करणार असल्याचे पवारांनी सांगितले. तुमच्याकडे बेंदूर असला तरी आमची गुरुपौर्णिमा आहे, असे सांगत त्यांनी उपस्थितांना नव्या महाराष्ट्राच्या जडणघडणीबाबत मार्गदर्शन केले.