Rakshabandhan 2023 : रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर भद्राचं सावट? शुभ मुहूर्त कोणता?; जाणून घ्या पंचांगकर्ते मोहन दाते यांच्याकडून राखी बांधण्याची तिथी व वेळ
बुधवारी (30 ऑगस्ट) दिवसभरात कोणत्याही वेळी आनंदाने साजरा करावा असे पंचागकर्ते मोहन दाते म्हणाले.
बहिण-भावाच्या अतुट नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन...(Raksha Bandhan 2023) दोन दिवसांवर हा सण आला असून बाजारपेठा सजल्या आहेत. मात्र यंदा रक्षाबंधनाच्या वेळेबाबत लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे आणि याचे कारण दुसरे तिसरे कोणी नसून भद्राकाळ आहे. त्यामुळे रक्षाबंधन नेमके किती वाजता करायचे याबाबत लोकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. कोणी बुधवारी सकाळी 10 च्या अगोदर राखीचा सण साजरा करण्याबद्दल बोलत आहेत, तर काही लोक रात्री 9 नंतर रक्षाबंधन साजरे करणार आहे अशी चर्चा आहे. मात्र हा संभ्रम पंचागकर्ते मोहन दाते यांनी दूर केला असून बुधवारी (30 ऑगस्ट) दिवसभरात कोणत्याही वेळी आनंदाने साजरा करावा असे म्हणाले.
यावर्षी नीज श्रावणामध्ये चतुर्थदशीला म्हणजे बुधवारी (30 ऑगस्ट) रोजी रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे. श्रावण पौर्णिमा म्हणजेच पौर्णिमा तिथी 30 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता सुरू होते परंतु रात्री 09: 02 मिनिटांपर्यत भद्रा कालावधी आहे. भद्रा कालावधीमुळे रक्षाबंधनाच्या वेळेबाबत संभ्रम आहे. रक्षाबंधनाचा जो पौराणिक विधी आहे त्या सगळ्याचे पालन करायचे म्हटले तर तो रक्षा होम करून रक्षा सूत्र हे राजाला बांधायचे असते. तसेच दुर्वा, अक्षता, चंदन, केसर, सोने घालून रेशमी वस्त्रामध्ये एक पुरचुंडी करून त्याला दोरा बांधून ती रक्षा आहे ती मनगटाला बांधणे म्हणजे खरे रक्षाबंधन आहे.
होम हवन करून केलेल्या रक्षाबंधनासाठी भद्रा काळ हा वर्ज्य सांगितला आहे. मात्र आत्ता आपण जे रक्षाबंधन साजरे करताना आपण फॅन्सी राख्या बांधतो. त्यामुळे बहिणीने भावाला राखी बांधताना, मित्राने मित्राला बांधताना, समाजबांधवांनी ऐकमेकांना बांधताना भद्रा काळ वर्ज्य करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे बुधवारी रक्षाबंधन दिवसभरात कोणत्याही वेळी आनंदाने साजरा करावा असे पंचागकर्ते मोहन दाते यांनी सांगितले आहे. त्यामुळे या दिवशी भाऊ-बहिणी दिवसभर रक्षाबंधनाचा सण साजरा करू शकतात.
भारतीय संस्कृतीमध्ये सामाजिक सलोखा जपणे, नातेसंबध जपणे, ऐकमेकांचे रक्षण करणे हा रक्षाबंधनाचा मुख्य होतू आहे. पूर्वीच्य काळी राजाच्या रक्षणासाठी रक्षाबंधन साजरे केले जात होते.मात्र सध्या साजरा करण्यात येणाऱ्या रक्षाबंधनाचा हेतू लक्षात घेता आम्ही पंचांगामध्ये देखील रक्षाबंधनांची कोणतीही वेळ आणि मर्यादा दिलेली नाही, असे देखील दाते यावेळी म्हणाले.