स्वातंत्र्य सैनिकाच्या नातसुनेचे नाव मतदान यादीत जाणीवपूर्वक टाळले
मतदान व पोटनिवडणूक लढवण्यापासून ठेवले वंचित; राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार
नेर, ता खटाव येथील स्वातंत्र्य सैनिकाची नातसून असलेल्या सौ मंजिरी निलेश चव्हाण यांनी नवीन मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी दोनवेळा सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर केला. तशी पोहोचही घेतली, मात्र जाणीवपूर्वक त्यांचे नाव यादीत समाविष्ट करण्यात आले नाही. याबद्दल त्यांनी राज्य निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली आहे.
पुसेगाव : नेर, ता खटाव येथील स्वातंत्र्य सैनिकाची नातसून असलेल्या सौ मंजिरी निलेश चव्हाण यांनी नवीन मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी दोनवेळा सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर केला. तशी पोहोचही घेतली, मात्र जाणीवपूर्वक त्यांचे नाव यादीत समाविष्ट करण्यात आले नाही. याबद्दल त्यांनी राज्य निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली आहे.
या गलथान कारभारामुळे दि. 21 रोजी होणारी नेर ग्रामपंचायत पोटनिवडणुक त्या लढवू शकत नाहीत. तसेच मतदान करण्यापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे तातडीने पुरवणी यादीत त्यांच्या नावाचा समावेश करावा. अन्यथा नेर ग्रामपंचायत पोटनिवडणूक पुढे ढकला, अशी मागणी सौ. मंजिरी चव्हाण यांनी केली आहे.
निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2022 पर्यंत 18 वर्षे पूर्ण होणार्या नवीन मतदारांच्या, मतदान यादीत नाव नोंदणीचा कार्यक्रम 9 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर या कालावधीत राबवला. नवीन मतदार यादी 1 नोव्हेंबर ला प्रसिद्ध झाली. याच मतदार यादीच्या आधारे दि. 21 डिसेंबर ला राज्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुका होणार आहेत. नेर, ता. खटाव येथील स्वातंत्र्य सैनिक ज्ञानदेव चव्हाण यांच्या स्नुषा कै. सुधाताई प्रकाश चव्हाण या नेर ग्रामपंचायत सदस्या होत्या. त्यांचे दि. 22 मे 2021 ला निधन झाले. त्या जागेवर ग्रामपंचायत पोटनिवडणूक लागलेली आहे. याच जागेवर निवडणूक लढवण्यासाठी सौ. मंजिरी निलेश चव्हाण यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून मतदार यादीत नाव नोंदणी साठी संबंधितांकडे दोनवेळा अर्ज दिला. मात्र प्रसिद्ध झालेल्या नवीन मतदार यादीत त्यांच्या नावाचा समावेश जाणीवपूर्वक टाळण्यात आल्याचे दिसून येत आहे. भारतीय घटनेनुसार मला मतदानाचा अधिकार तसेच निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. मात्र जाणीवपूर्वक गलथान कारभार करून मला माझ्या अधिकारापासून वंचित ठेवणार्या अधिकार्यांवर कारवाई करावी तसेच पुरवणी यादीत माझे नाव समाविष्ट करावे, मगच नेर ग्रामपंचायत ची पोटनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी सौ. मंजिरी चव्हाण यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.