जीपने दुचाकीला दिलेल्या धडकेत सामाजिक कार्यकर्त्याचा मृत्यू
वाई-वाठार रस्त्यावर घडली दुर्दैवी घटना
वाई-वाठार रस्त्यावरील शांतीनगर येथे झालेल्या भीषण अपघातात खानापुर, ता.वाई येथील किशोर चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला.
वाई : वाई-वाठार रस्त्यावरील शांतीनगर येथे झालेल्या भीषण अपघातात खानापुर, ता.वाई येथील किशोर चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला.
वाई बाजुकडुन दुचाकी वरुन खानापुर स्टॉप येथे घरी निघालेले किशोर चव्हाण (वय ४५) यांच्या गाडीला केळी भरुन वाईकडे भरघाव वेगात जाणाऱ्या एका पिकअप जीपने जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांना काल रात्री सव्वा बारा वाजता ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने आपले सहकारी शिर्के, उमेश गहीण, हेमंत शिंदे व दोन होमगार्ड घटनास्थळावर पाठवले. या पथकाने मृतदेह ताब्यात घेऊन तो वाईच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.
पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहने व पिकअपचा चालक ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला. यावेळी किसनवीर कारखान्याचे संचालक किरण काळोखे, अमोल जाधव यांनी घटनास्थळावर पोलिस व रुग्णालय प्रशासनास मदत केली.