maharashtra

गोष्ट एका जहाजाची, ज्याने संपूर्ण जगाला मुंबई जवळ आणलं


The story of a ship that brought the whole world closer to Mumbai
मुंबईत अनेक नवे उद्योग, कंपन्या उदयास आल्या. याच श्रुंखलेत आणखी एका महत्वाच्या घटनेमुळे मुंबईच्या लौकिकात आणखी एक भर पडली. 20 मार्च 1830 रोजी मुंबईचे प्रवेशद्वार जगासाठी खुले झाले.

मुंबई : इ.स. 1830 साली मुंबईमध्ये दोन मोठ्या घटना घडल्या. यामुळे मुंबईचा चेहरामोहरा बदलून गेला. मुंबईच्या विकासात कोकणचा सह्याद्री आडवा येत होता. सह्याद्रीच्या कड्यामुळे घाटावरील प्रदेश मुंबईपासून लांब पडला होता. बोरघाट हा त्यात प्रमुख अडसर होता. थळ आणि बोर येथे मोठ्या खिंडी होत्या. 1803 च्या काळात इंग्रज गव्हर्नर लॉर्ड वेलस्ली आपल्या सैन्यासह पुण्याला गेला. त्यावेळी त्याने आपल्या सैन्याला जाण्यासाठी बोरघाटमध्ये छोटा रस्ता तयार केला. पण, तेथून फक्त खेचरांवरून माल नेण्याइतपत वाट होती. त्यामुळे तेथून होणारी वाहतूक जिकिरीची आणि खर्चिक होती. मेण्यातून हा घाट ओलांडण्यासाठी माणसाला शेकडो रुपये खर्च येत असे.

1809 साली माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन याने पश्चिम भारताची राजधानीचा मान मुंबईला दिला. बोरघाटात चांगला रस्ता बनवण्याची त्याने योजना आखली. कमीत कमी बैलगाड्या तरी जाव्यात इतका रस्ता असावा अशी त्याची इच्छा होती. मुंबईला चांगले दिवस आणण्याच्या दृष्टीने टाकलेले हे पहिले पाऊल होते. पण, हा रस्ता होण्यासाठी 20 वर्ष जावी लागली.

मुंबईचे गव्हर्नर सर जॉन माल्कम यांनी 10 नोव्हेंबर 1830 रोजी खोपोलीपलीकडे असलेल्या बोरघाटातील रस्त्याचे उद्घाटन केले. मुंबईच्या अनेक प्रतिष्ठित नागरिकांसोबत बैलगाड्यांमधून त्याने हा घाट पार केला. खोपोली ते खंडाळा हा साडे चार मैलांचा रस्ता अतिशय चिंचोळा होता. मात्र, या रस्त्यामुळे प्रवासी आणि मालवाहतुक खर्चात लक्षणीय घट झाली.

मुंबईचे प्रवेशद्वार जगासाठी खुले
मुंबईचा कापूस उद्योग इतका तेजीत आला की एका वर्षात कोट्यवधी कापसाचे गठ्ठे निर्यात केले गेले. यामुळे मुंबईत अनेक नवे उद्योग, कंपन्या उदयास आल्या. याच श्रुंखलेत आणखी एका महत्वाच्या घटनेमुळे मुंबईच्या लौकिकात आणखी एक भर पडली. 20 मार्च 1830 रोजी मुंबईचे प्रवेशद्वार जगासाठी खुले झाले.

‘ह्यूज लिंडसे’ जहाजाचा ऐतिहासिक प्रवास
मुंबईच्या बॉम्बे डॉक्स येथील शिपिंग यार्डमध्ये वाफेवर चालणाऱ्या जहाजावर काम सुरू झाले होते. वाफेवर चालणारे असे हे भारतातले पहिलेच जहाज होते. या जहाजाला ‘ह्यूज लिंडसे’ असे नाव देण्यात आले होते आणि या जहाजाचा कॅप्टन होता जे.एच.विल्सन. 20 मार्च 1830 रोजी संध्याकाळी पाच वाजता ‘ह्यूज लिंडसे’ जहाजाने मुंबई बंदर सोडून सुवेझ कालव्याच्या दिशेने आपला ऐतिहासिक प्रवास सुरु केला.

मुंबई आणि युरोपमधील वाहतुकीच्या क्षेत्रात एका नव्या पर्वाचा आरंभ झाला. अनेक नामवंत लोक आणि जनसामान्य मुंबई बंदरात हा सोहळा पाहण्यासाठी जमले होते. 411 टन वजनाचे हे जहाज बनवण्यास 1 लाख 99 हजार 286 रुपये खर्च आला. 21 दिवस आणि साडे नऊ तासांचा प्रवास करून हे जहाज सुवेझला पोहोचले.

एडन, मोचा आणि जेडाह या बंदरांत ‘ह्यूज लिंडसे’ थांबले होते. तर, सुवेझहून परत येण्यासाठी 19 दिवस आणि 18 तास लागले. 29 मे 1830 रोजी संध्याकाळी सहा वाजता ‘ह्यूज लिंडसे’ मुंबई बंदरात पोहोचले. ‘ह्यूज लिंडसे’च्या या प्रवासाने मुंबई ते लंडन समुद्र सफरीचा मार्ग मोकळा झाला.

यापूर्वी लंडनला जाण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या केप टाउनला वळसा घालून जावे लागत असे. त्यासाठी कित्येक दिवस लागत. पण, सुवेझ कालवा झाल्यामुळे हा प्रवास सुलभ झाला. मात्र, यामुळे मुंबईनगरी समुद्रमार्गे साऱ्या जगाशी जोडली गेली आणि मुंबईच्या प्रगतीला खऱ्या अर्थाने सुरवात झाली.