maharashtra

मुख्यमंत्री प्रणित सातारा जिल्हा शिवसेनेची जबाबदारी पुरुषोत्तम जाधव यांच्याकडे

साताऱ्यात आज शिवसेनेची बैठक; जिल्हा कार्यकारणी होणार जाहीर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावा केलेल्या शिवसेना जिल्हाध्यक्षपदी पुरुषोत्तम जाधव यांची वर्णी लागली आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक आज उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई व कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे.

सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावा केलेल्या शिवसेना जिल्हाध्यक्षपदी पुरुषोत्तम जाधव यांची वर्णी लागली आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक आज उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई व कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. यावेळी जिल्ह्याची कार्यकारणी जाहीर केली जाणार असून अनेकांचे प्रवेश या निमित्ताने होणार आहेत, अशी माहिती सातारा शिवसेनेचे नूतन जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असून जिल्ह्याच्या विकासासाठी ते भरघोस निधी निश्चितच देणार आहेत, असे जाधव यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, सातारा- जावली विधानसभा, कोरेगाव विधानसभा व वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा या तीन विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्राची संघटनात्मक जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली असून कराड दक्षिण, कराड उत्तर, पाटण या तीन मतदारसंघांची जबाबदारी जयवंत शेलार यांच्याकडे देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचे प्रलंबित प्रश्न विकास योजनांसाठी सातत्याने पाठपुरावा करून ते विषय मार्गी लावण्यासाठी आमची धडपड असणार आहे. शिंदे साहेबांनी ही जबाबदारी दिली असून या निमित्ताने पुन्हा एकदा कामाची संधी मिळाली आहे. मी एक जिल्हा एक जिल्हाप्रमुख, अशी भूमिका मांडली होती. मात्र सध्या तरी विकास कामांकरिता प्रस्तुत संघटनात्मक रचना स्वीकारण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्या पद्धतीने आमचे कामकाज सुरू झाले आहे. जे पदाधिकारी नेमले जाणार आहेत त्यांची बैठक शनिवार दिनांक 19 रोजी येथील हॉटेल प्रीती एक्झिक्युटिव्ह येथे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई व कोरेगाव चे आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होणार असून येथे अनेक संघटनात्मक पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे प्रवेश घेतले जाणार आहेत व जिल्हा संघटन कार्यकारणी या निमित्ताने जाहीर केली जाणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.
चंद्रकांत जाधव यांची जिल्हाप्रमुख पदी येण्याची इच्छा होती या प्रश्नावर जाधव म्हणाले, त्यांना संघटक पद दिले जाणार आहे, तर शरद कणसे यांच्याकडे जिल्हा संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यापुढील काळात भाजप व शिवसेना युतीच पुढे जाणार असून हे संघटन मजबूत होणार आहे. जिल्ह्याचे पुनर्वसन, सिंचन, रोजगार तसेच पायाभूत सुविधांचे अनेक प्रश्न आहेत. सातारा जिल्ह्यात नवीन उद्योग आले पाहिजेत याकरिता उद्योग मंत्री उदय सामंत यांची नुकतीच भेट घेतल्याचे जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राष्ट्रवादीचे कोण संपर्कात आहेत का तसेच उद्धव ठाकरे यांच्या गटाचे कोणी आपल्या संपर्कात आहे का या प्रश्नांवर बोलताना जाधव म्हणाले मूळ संघटना आमच्या सोबत आहेत आणि ती ताकतीने पुढे वाटचाल करत आहे. जे आमच्या सोबत येतील त्यांना आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत. मुख्यमंत्री हे सातारा जिल्ह्याचे आहेत. सातारा जिल्ह्याच्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी त्यांनी जास्तीत जास्त निधी देण्याचे प्रस्तावित केले असून त्या पद्धतीने त्यांचे काम सुरू झाले आहे. विकासाच्या मुद्द्यावर जे आमच्याकडे येणार असतील तर अशा लोकांचे  निश्चितच स्वागत करू, असे जाधव म्हणाले.
पत्रकार परिषदेच्या दरम्यान दालनाच्या दुसऱ्या बाजूला खासदार उदयनराजे भोसले यांची बैठक सुरू होती. तेव्हा ज्यांनी एकेकाळी परस्परविरोधी लोकसभेची निवडणूक लढली त्यांची आता वाटचाल कशी असणार या प्रश्नावर बोलताना पुरुषोत्तम जाधव म्हणाले, आम्ही दोघे समोरासमोर लढलो हा भूतकाळ होता. आता आम्ही एकाच युतीत असून एकमेकांचे चांगले मित्र आहोत. आमच्यात कोणताही वाद-विवाद नाही. आम्ही मिळून सातारा जिल्ह्यावर निश्चित शिवसेनेचा भगवा फडकवू यात शंका नाही. एकनाथ शिंदे यांच्या सूचनेप्रमाणे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.