maharashtra

शिवसेना जिल्हाप्रमुखांनी घेतली बँक व्यवस्थापकाची झाडाझडती

अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज प्रकरणावरून सचिन मोहिते आक्रमक

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या आर्थिक मागास प्रवर्गाच्या लाभार्थ्यांना कर्ज देण्यास बँक ऑफ बडोदाच्या व्यवस्थापकांनी टाळाटाळ केल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख (ठाकरे गट) सचिन मोहिते यांनी संबधित व्यवस्थापकाची चांगलीच कानउघाडणी केली. वेळेत कर्ज न दिल्यास या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

सातारा : अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या आर्थिक मागास प्रवर्गाच्या लाभार्थ्यांना कर्ज देण्यास बँक ऑफ बडोदाच्या व्यवस्थापकांनी टाळाटाळ केल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख (ठाकरे गट) सचिन मोहिते यांनी संबधित व्यवस्थापकाची चांगलीच कानउघाडणी केली. वेळेत कर्ज न दिल्यास या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या आर्थिक मागास प्रवर्गाची कर्ज प्रकरणे मंजूर करताना राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकारी जाचक अटी सांगून लाभार्थ्यांची कोंडी करतात. त्यामुळे लघु उद्योगा संदर्भातील कर्ज मंजूर होत नसल्याच्या तक्रारी शिवसेनेला प्राप्त झाल्या होत्या. मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता जिल्हाप्रमुख सचिन मोहिते त्यांच्या सहकार्‍यांनी पोवई नाक्यावरील बँक ऑफ बडोदा च्या शाखा व्यवस्थापकांची भेट घेतली. मोहिते यांनी संबधित व्यवस्थापकाला कर्ज प्रकरण मंजूर न केल्याबद्दल चांगलीच कानउघाडणी केली. व्यवस्थापकाने हिंदीत संवाद सुरू केल्याने मोहिते संतापले. महाराष्ट्रात आहात ना, तुम्हाला मराठी यायलाच पाहिजे. काय असेल तर मराठी बोला असे सुनावत बँक व्यवस्थापनाला फैलावर घेतले. शिवसैनिकांच्या आक्रमक पवित्र्यापुढे बँक कर्मचार्‍यांची बोलतीच बंद झाली. यापुढे जिल्हाधिकार्‍यांचे नियम डावलून जर कर्ज प्रकरणे मंजूर न केल्यास तीव्र आंदोलन करू, असा थेट इशारा मोहिते यांनी दिला.
यावेळी सचिन मोहिते जिल्हाप्रमुख, सागर रायते तालुकाप्रमुख, शिवराज टोणपे शहर प्रमुख, शिवेन्द्रा ताटे युवासेना शहर प्रमुख रवींद्र भणगे, अक्षय दौंडे, इम्रान बागवान, हरी पवार, मंदार भांडवलकर, आशिष कुलकर्णी, संतोष शिंदे, विशाल जाधव आदीं यावेळी उपस्थित होते.