maharashtra

पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची सुमारे तीन लाखांची फसवणूक


पोलीस असल्याची बतावणी करून अज्ञात भामट्याने वृद्धाची सुमारे तीन लाखांची फसवणूक केली असल्याची तक्रार वडूज पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

सातारा : पोलीस असल्याची बतावणी करून अज्ञात भामट्याने वृद्धाची सुमारे तीन लाखांची फसवणूक केली असल्याची तक्रार वडूज पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 21 फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास प्रकाश ज्ञानेश्वर बनकर रा. वडूज, ता. खटाव हे वडूज शहरातून किराणामाल घेऊन घरी जात असताना पाठीमागून एक चॉकलेटी रंगाचा शर्ट घातलेला, डोक्यात हेल्मेट व तोंडास काळ्या रंगाचा मास्क घातलेल्या एका 40 ते 45 वर्षाच्या माणसाने पाठीमागून येऊन बनकर यांना थांबवले आणि त्यांना म्हणाला, मी पोलीस अधिकारी आहे. मी तुम्हाला आवाज देतोय तुम्ही का थांबत नाही? तुम्ही पोलिसांना किंमत देत नाही. पुढे पोलिसांची चेकिंग चालू आहे, असे म्हणत रस्त्यावर अगोदरच थांबलेल्या एकास या भामट्याने बोलवून घेऊन त्याच्याकडील साहित्य मागून घेतले. त्यानंतर तो बनकर यांना म्हणाला की, तुमच्या गळ्यातील चेन व बोटातील अंगठ्या आणि खिशातील पैसे काढा, मी तुमच्याकडे रुमालात व्यवस्थित बांधून देतो. तो असे म्हणल्यावर बनकर यांनी त्यांच्या गळ्यातील चेन,  अंगठ्या, घड्याळ व पैसे रुमाला मध्ये ठेवून त्याच्या जवळ न देता बनकर त्याला म्हणाले की राहू दे मी माझा रुमाल ठेवतो. त्याच वेळेस संबंधित भामटा अतिशय जलद गतीने बनकर यांच्या जवळून मोटरसायकल वरून निघून गेला. त्यानंतर बनकर यांनी रुमाल खोलून पाहिले असता त्यामध्ये त्यांची सुमारे 75 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, 30 ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या असे एकूण 3 लाख 10 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल भामट्याने लंपास केला असल्याची बनकर यांची खात्री झाली. याबाबत अज्ञात तोतया पोलीस अधिकाऱ्यावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार ओंबासे करीत आहेत.