maharashtra

आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये सर्वात जास्त खर्च उच्च शिक्षणावर आणि अत्यंत कमी खर्च प्राथमिक शिक्षणावर होतो.हेच भारतीय शिक्षण पद्धतीचे सर्वात मोठे दुर्दैव आहे असे मत प्रा.नितीन बानुगडे पाटील यांनी व्यक्त केले.


Prof. Nitin Banugade Patil expressed the view that in today's education system, the highest expenditure is on higher education and very little expenditure on primary education. This is the biggest misfortune of the Indian education system.
रहिमतपूर, ता. कोरेगाव येथे भारतीय अभिरुप शिष्यवृत्ती राज्यस्तरीय परीक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ पार पडला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नितीन बानुगडे - पाटील बोलत होते. व्यासपीठावर खासदार श्रीनिवास पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, श्री गाडगेबाबा मिशन मुंबईचे चेअरमन मधुसूदन मोहिते पाटील, आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार माने पाटील, श्री चौंडेश्वरी एज्युकेशन सोसायटीचे सचिव अरुण माने, विद्यार्थी विकास फाउंडेशनच्या अध्यक्ष्या मनिषा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रा.बानुगडे पाटील म्हणाले,मुलांना कोणत्या पद्धतीचे शिक्षण मिळते यावर त्यांच सगळं भवितव्य अवलंबून आहे. दगड-मातीच घर बांधण्यासाठी आम्ही खूप नियोजन करतो तर मुलांच्या आयुष्याची इमारत उभी करण्यासाठी किती काटेकोर नियोजन केले पाहिजे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

मुलांमध्ये कृती,क्षमता,कौशल्य,सातत्य आहे.पण दुर्दैवानं आपल्यात काय आहे हे विद्यार्थ्यालाही कळत नाही आणि त्यांच्या पालकांनाही कळत नाही ही आमची शोकांतिका आहे.आम्हाला नेमकं काय करायचं आहे याचा शोध घेतला पाहिजे.आम्ही ठरवू तेच मुलांनी बनायचे ही आपल्या देशातील पद्धती आहे.परंतु,पाश्चात्य देशांमध्ये त्याच्या आवडीनुसार त्या-त्या क्षेत्रामध्ये त्याला प्राधान्य दिले जाते.मुलाचा नैसर्गिक कल काय आहे.तो काय करू शकतो हे ठरवता आलं पाहिजे.त्या पद्धतीने त्याला प्रोत्साहन आणि प्रेरणा देता आली पाहिजे.असे ते म्हणाले.

या जगात तुमचा दुसरा कोणीही पराभव करू शकत नाही.तुम्हीच तुमचा पराभव करू शकता.ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. या जगात दुसरं कोणीही तुम्हाला विजयी करू शकत नाही.तुम्हीच तुम्हाला विजयी करू शकता.तुझं आयुष्य तूच घडवू शकतोस हे मुलांना सांगितलं पाहिजे. स्वतःच्या क्षमता ओळखून वाटचाल केली पाहिजे.
आपण आपल्या क्षमता आणि मर्यादा बंधन घातलेलं आहे. मुलांना अमर्याद करा.त्यांना कोणतीही बंधन घालू नका.बंधनांच्या बाहेर त्यांना जाऊ द्या.तरच क्षमता,सामर्थ्य व शक्तीचा वापर करू शकेल. जन्मजात मुलात कुतुहल व जिज्ञासा असते.तुमचे मन तुमचे विचार काय सांगतात हे सर्वात महत्त्वाचे आहे.मुलांना सकारात्मकता शिकवण महत्त्वाचं आहे.आम्ही मुलांच्या बुद्धीचा वापर होऊ देत नाही ही अलीकडच्या काळातली समस्या आहे.मुलांमध्ये क्षमता आहे.संकट आल्याशिवाय क्षमता सिद्ध होत नाही.संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत तर संकट तुमची उंची वाढवण्यासाठी येतात.अडथळे तुम्हाला रोखायला येत नाहीत.अडथळे तुमच्यातल्या क्षमता पाहायला येतात.अडचणी कौशल्य वाढवायला येतात.कष्ट कमी पडतात म्हणून मुलं अपयशी होतात.
जो अखंड काम करतो तो दीर्घायुषी होतो आणि जो निवांत आरामात जगतो तो अल्पायुषी होतो.यासाठी मुलांना कष्ट करायला शिकवा.प्रत्येक गोष्टीत सातत्य ठेवायला शिकवा.सततचे सातत्य नंतर तुमची सवय बनते आणि सवयच तुमचं चरित्र आणि चारित्र्य घडवत राहते. त्यामुळे कष्टाला पर्याय नाही.मुलं घडवायचे असतील तर त्यांच्या जिज्ञासा हवी.आई ही मुलांची पहिली शाळा असते आणि शाळा ही मुलाची दुसरी आई असते या दोन आईच्या कुशीत आपलं मूल घडत असतं.असे बानुगडे पाटील म्हणाले.

खा.श्रीनिवास पाटील म्हणाले,आजचे युग स्पर्धेचे आहे.या स्पर्धेच्या युगात देशसेवा,देशभक्ती करणारी पिढी तयार झाली पाहिजे.जिद्द व चिकाटी सोडू नका.विद्यार्थी घडवायचे असतील तर आतून आधार व वरून थापटावे लागते.तरच आदर्श विद्यार्थी घडतात.देशाभिमान जागृत करणारी प्रेरणा गरजेची असून चांगले नागरिक, अधिकारी घडविण्यासाठी येणाऱ्या स्पर्धा युगात अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा प्रेरणादायी ठरेल.

कार्यक्रमासाठी सातारा, सांगली, सोलापूर,कोल्हापूर व पुणे जिल्ह्यातील विद्यार्थी व पालक उपस्थित होते. प्रास्ताविक विध्यार्थी विकास फौंडेशनचे मार्गदर्शक रुपेश जाधव यांनी केले, सूत्रसंचालन विकास पवार यांनी केले आभार सुभाष जाधव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभिरुप परीक्षेचे सर्व तालुका समन्वयक,मित्र परिवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

चौकट...
(तर ...मोबाईल डिटाॅक्स सेंटर ...
मुलांच्यामध्ये विश्वास निर्माण करा.मुलांच्या मध्ये अवांतर वाचन किती हा चिंतनाचा विषय आहे.मोबाईल वापराचा अतिरेक झाला तर येत्या पाच वर्षात गावोगावी मोबाईल डिटॉक्स सेंटर उभा करण्याची वेळ येईल.मुलं पुस्तकात किती वेळ घालवतात व मोबाईल स्क्रीनवर किती वेळ घालवतात ही देखील चिंतनाची गोष्ट आहे.मोबाईल हे तंत्रज्ञान कधीही बंद होणार नाही.याचा वापर कसा करायचा हे आम्ही ठरवले पाहिजे. )

चौकट...
( कमतरतांना बलस्थान बनवा....
कमतरतांना बलस्थान बनवा आणि बलस्थानांचा वापर करून स्वतःचं कर्तुत्व घडवा.परिस्थिती माणसाला घडवत ही नाही आणि बिघडवतही नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो ही वस्तुस्थिती आहे.मुलांच्या अंगी जिज्ञासा असली पाहिजे.मुलांना काय बनवायचं हे ध्येय ठरवा, ध्येय ठरलं की नियोजन करा, नियोजन केलं की प्रत्यक्ष कृतीला आरंभ करा.मग या जगात अशक्य असं काहीच उरणार नाही.)