कारखानदारांना आंदोलनाशिवाय दुसरी भाषा कळत नाही
पंजाबराव पाटील : एफआरपी अधिक 600 दर मिळेपर्यंत ठिय्या देणार
ऊसाला एफआरपी अधिक सहाशे रुपये दर मिळाला पहिले, या मागणीसाठी आम्ही संघर्ष यात्रा काढून सहकारमंत्र्यांच्या दारात ठिय्या आंदोलन करणार होतो. परंतु, प्रशासनाने आमची कोंडी करून रोखून धरले. मात्र, आम्ही कराडमध्ये कुठेही बसलो, तरीही सहकारमंत्र्यांच्या दारातच ठिय्या दिल्यासारखा आहे.
कराड : ऊसाला एफआरपी अधिक सहाशे रुपये दर मिळाला पहिले, या मागणीसाठी आम्ही संघर्ष यात्रा काढून सहकारमंत्र्यांच्या दारात ठिय्या आंदोलन करणार होतो. परंतु, प्रशासनाने आमची कोंडी करून रोखून धरले. मात्र, आम्ही कराडमध्ये कुठेही बसलो, तरीही सहकारमंत्र्यांच्या दारातच ठिय्या दिल्यासारखा आहे. शेतकऱ्यांना त्यांच्याच हक्काचे पैसे मागण्यासाठी आंदोलने करावी लागत असून कारखानदारांना त्याशिवाय दुसरी भाषा कळत नाही. परंतु, जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नसल्याचा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिला.
बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून रविवारी ७ रोजी काढण्यात आलेली संघर्ष यात्रा पोलीस प्रशासनाने दत्त चौकात नाकाबंदी करून रोखून धरली. त्यानंतर आंदोलकांनी येथील प्रशासकीय कार्यालयापुढे ठिय्या दिला. त्यानंतर संघर्ष यात्रेचे सभेत रुपांतर झाले. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष बी.जी. पाटील, प्रदेश युवाध्यक्ष नितीन बागल, जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, सांगली जिल्हाध्यक्ष उन्मेश देशमुख, सोलापूर जिल्हाध्यक्ष रामदास खराडे, जयंत गायकवाड, माऊली जवळेकर, आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे व शेतकरी उपस्थित होते.
पंजाबराव पाटील म्हणाले, सध्या महागाईचा भडका उडाला आहे. त्याचा सामना करण्यासाठी शेतमालाला योग्य दर मिळाला तरच आपण टिकू शकतो. अन्यथा, शेतकऱ्यांची मोठी आर्थिक वाताहत होईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला गुलामगिरीतून बाहेर काढले. त्यांनतर इंग्रजी पारतंत्र्यातूनही आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. मात्र, सध्या आपण राजकीय गुलामगिरीत असून शेतकऱ्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, यासाठी आमचा लढा आहे.
ते म्हणाले, साखरेला 2800 रुपये दर असताना शेतकऱ्यांना जो दर मिळत होता, तोच दर आज 3600 रुपये झाला तरीही आपणाला तोच दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी पिळवणूक होत असून ती यापुढे खपवून घेणार नाही. यासाठी जोपर्यंत ऊसाला एफआरपी अधिक 600 रुपये दर मिळत नाही, तोपर्यंत आम्ही येथेच ठिय्या देणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तसेच कारखानदार जर आपली कोंडी करत असतील तर आपणही ऊस त्यांच्या कारखान्याला न घालता त्यांचीही कोंडी करू. त्यामुळे शेतकऱ्यांनी एफआरपी अधिक 600 रुपये दर मिळाल्याशिवाय ऊसाच्या तोंडी थांबवाव्यात. आपल्या मागणीला नक्कीच यश येईल, असे वचनही पंजाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांना यावेळी दिले.
प्रदेशाध्यक्ष बी.जी. पाटील म्हणाले, सहकारमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढून मोठे पातक केले आहे. मात्र, त्यांनी प्रशासनाच्या माध्यमातून आंदोलन मोडून आमच्यावर गुन्हे जरी दाखल केले. तरीही आम्ही मागे हटणार नसून आता आमची मागणी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही थांबणार नसल्याचेही त्यांनी यावेळी बजावले आहे.
दरम्यान, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या येडेमच्छिंद्र या गावातून रविवारी 7 रोजी बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या संघर्ष यात्रेला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर येडेमच्छिंद्र, शिरटे, नरसिंहपूर, खुबी, कृष्णा कारखाना, रेठरे बुद्रुक, गोंदी, शेरे दुशेरे, शेणोली, वडगाव हवेली, कोडोली, कार्वे, कापिल, गोळेश्वर व कराड असा या यात्रेचा मार्ग होता. ही संघर्ष यात्रा कराड शहरात प्रवेश करण्यापूर्वी पोलीस प्रशासनाने ठिकठिकाणी बॅरिगेट्स लाऊन आंदोलकांची कोंडी केल्याचे दिसून आले. तसेच आंदोलकांना दत्त चौकातच रोखून धरत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या निवास्थानी पोहचू दिले नाही. त्यामुळे आंदोलक, शेतकरी चांगलेच संतप्त झाले होते. त्यामुळे त्यांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर येथील प्रशासकीय कार्यालयासमोर त्यांनी ठिय्या देऊन आंदोलनास प्रारंभ केला. त्याचबरोबर जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आंदोलनावर ठाम राहण्याची भूमिकाही त्यांनी घेतली आहे.
अग्निशमन बंबही तैनात
ऊसाला एफआरपी अधिक 600 रुपये दर मिळावा, या मागणीसाठी बळीराजातर्फे काढण्यात आलेली संघर्ष यात्रा, आंदोलक व शेतकऱ्यांची कोंडी करण्यासाठी प्रशासनाने चांगलाच चंग बांधल्याचे दिसून आले. त्यासाठी शहर व नियोजित संघर्ष यात्रा मार्गावरही मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला होता. शिवाय, आंदोलकांनी आक्रमक पवित्र घेतल्यास अग्निशमन बंबाच्या सहाय्याने त्यांना रोखण्याची व्युव्हरचनाच पोलीस प्रशासनाने आखली होती. याचीही चर्चा उपस्थितांमध्ये चांगलीच रंगल्याचे दिसून आले.