maharashtra

पत्रकारदिनी दर्पणकारांना अभिवादन

जिल्ह्यात विधायक उपक्रम : सामाजिक संघटनांचाही सहभाग

Greetings to the journalists on Press Day
सातारा जिल्ह्यात गुरूवारी पत्रकार दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. सातार्‍यात जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, सातारा जिल्हा पत्रकार संघ, सातारा पत्रकार संघ व इलेक्ट्रॉनिक पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले. दरम्यान, सातारा शहरासह जिल्ह्यात विविध विधायक उपक्रमांनी पत्रकार दिन साजरा झाला. यामध्ये अनेक सामाजिक संघटनांनी सहभाग नोंदवला.

सातारा : सातारा जिल्ह्यात गुरूवारी पत्रकार दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. सातार्‍यात जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, सातारा जिल्हा पत्रकार संघ, सातारा पत्रकार संघ व इलेक्ट्रॉनिक पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले. दरम्यान, सातारा शहरासह जिल्ह्यात विविध विधायक उपक्रमांनी पत्रकार दिन साजरा झाला. यामध्ये अनेक सामाजिक संघटनांनी सहभाग नोंदवला.
पत्रकार दिनाच्यानिमित्ताने सातार्‍यातील जिल्हा माहिती कार्यालयातील सभागृहात कार्यक्रमाचे आयोेजन करण्यात आले होतेे. अध्यक्षस्थानी दै. ‘पुढारी’चे वृत्तसंपादक व सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे होते. यावेळी सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, सरचिटणीस दीपक प्रभावळकर, ज्येष्ठ पत्रकार जीवनधर चव्हाण, श्रीकांत कात्रे, जिल्हा माहिती अधिकारी दत्तात्रय कोकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
हरीष पाटणे म्हणाले, सातारच्या पत्रकारितेने एक मापदंड तयार केला आहे. त्या जोरावर जिल्ह्याच्या विकासाची वाटचाल गतीमान होत आहे. चौथा स्तंभ म्हणून घटनेने जो दर्जा दिला आहे तो सर्वांनी नीट समजावून घ्यावा. अधिकृत असलेल्या व नावाजलेल्या मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असणारा सातारा जिल्हा पत्रकार संघ आपल्या सर्व पत्रकारांच्या जोरावरच यशस्वी घौडदोड करत आहे. याच जोरावर पुढेही जिल्ह्यातील प्रत्येक पत्रकारांच्या मदतीला ही संघटना बांधील राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
विनोद कुलकर्णी म्हणाले, पत्रकारांनी एकमेकांच्या गुणांचा आदर केला पाहिजे. जिल्ह्यातील पत्रकारांना जेव्हा जेव्हा अडचण आली आहे तेव्हा तेव्हा हरीष पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा पत्रकार संघ मदतीला धावून आला आहे. अशाच पध्दतीने यापुढेही जिल्हा पत्रकार संघाचे काम सुरु राहील. सातारा शहरात हरीष पाटणे यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार भवन निश्चितपणे उभे राहिल, अशी अपेक्षा कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
यावेळी दीपक प्रभावळकर, श्रीकांत कात्रे, गजानन चेणगे, ओंकार कदम, सनी शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले. सातारा मराठी पत्रकार परिषद सोशल मीडियाच्या वतीने इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियामध्ये काम करणार्‍या 70 सभासद पत्रकारांचा 1 लाख रुपयांचा अपघाती विमा उतरवून या अपघात विमा पॉलिसीचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. दरम्यान, यावेळी गजानन चेणगे, केशव चव्हाण, श्रीकांत मुळे, सचिन बर्गे, विनित जवळकर, प्रशांत जाधव, साई सावंत, प्रशांत जगताप, संदीप कुलकर्णी, पद्माकर सोळवंडे तसेच प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडियाचे पदाधिकारी, पत्रकार, फोटोग्राफर उपस्थित होते.
दरम्यान, जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये पत्रकारांनी स्वच्छता मोहीम, ज्येष्ठांचा सन्मान, कोरोना योध्द्यांचा सत्कार असे विविध विधायक उपक्रम राबवून पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.