शासकीय योजनांसाठी जिल्हाभर जनसंपर्क अभियान राबवणार
उमेश चव्हाण यांची माहिती : सावित्रीबाई फुले जयंतीदिनी आरंभ
शासनाकडून वंचित घटकांसह अल्प भू धारक शेतकरी, शेतमजूर, भूमीहीन आदी घटकांसाठी विविध योजना जाहीर केल्या जातात. मात्र, अनेकवेळा त्या लोकांना माहिती नसल्याने त्यांच्या पर्यंत पोहोचतही नाहीत.
सातारा : शासनाकडून वंचित घटकांसह अल्प भू धारक शेतकरी, शेतमजूर, भूमीहीन आदी घटकांसाठी विविध योजना जाहीर केल्या जातात. मात्र, अनेकवेळा त्या लोकांना माहिती नसल्याने त्यांच्या पर्यंत पोहोचतही नाहीत. अशा प्रकारच्या विविध शासकीय योजनांची माहिती गावोगावी लोकापर्यंत पोहोचवण्यासाठी दि. 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी त्यांच्या जन्मगाव नायगाव, ता. खंडाळा येथून जनसंपर्क अभियानास आरंभ करणार असल्याची माहिती अभियानाचे संयोजक व सामाजिक कार्यकर्ते उमेश चव्हाण यांनी दिली.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली असून लोकसाहित्यिक अण्णाभाऊ साठे कृती समिती व सातारा जिल्हा दलित महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने हे जनसंपर्क अभियान राबवण्यात येणार आहे. यामध्ये वीस कार्यकर्ते विविध शासकीय योजनांची माहिती गावागावात जावून स्पिकर व माहिती पत्रकाद्वारे वंचित घटकांपर्यंत पोहोचवणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
घरकूल योजना, शेती साहित्य वाटप योजना, गरिबांना सांसारिक साहित्य वाटप, भूमीहिनांना जमीन वाटप, अंपगांना सायकल वाटप, गरिब महिलांना रोजगारासाठी शिवणयंत्रे वाटप तसेच स्वयंरोजगारासाठी शासनाकडून अर्थसहाय्य करण्यात येत असते. अशा अनेक योजनांची जाहिरात राज्य शासनाकडून केली जाते. मात्र, प्रत्यक्षात या योजना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतच नाहीत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 अखेर या देशात कोणीही घरकुलापासून वंचित राहणार नाही अशी घोषणा केलेली आहे. त्यासाठी जागेसह घरकूल बांधून देण्याची योजना राबवण्यात येत आहे. मात्र, अनेक ठिकाणी ही योजना शासकीय अधिकाऱ्यांकडून योग्य पध्दतीने राबवली जात नाही. त्यामुळे विविध जाती धर्मातील अनेक नागरिकांना घरांची आवश्यकता असून देखील शासकीय योजनेतून घरकूल योजनेचा लाभ मिळालेला नाही.
अगदी साध्या रेशनकार्ड, उताऱ्यापासून सर्वच स्तरावर ज्या पध्दतीने शासनाचा कारभार चालतो. याबाबत लोकांना येणाऱ्या अडचणी समजावून घेवून या विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जनसंपर्क अभियान सुरु करत आहोत. यामध्ये एका मोठ्या गाडीत 20 कार्यकर्ते ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवणार असून लोकांच्या अडचणीही समजावून घेणार असल्याचे उमेश चव्हाण यांनी सांगितले.