चव्हाणवाडी येथे निर्माण झालेल्या तीव्र पाणी टंचाई, प्रशासनाकडून होत असलेले दुर्लक्ष यामुळे गावातील महिला संतप्त झाल्या आहेत.
चाफळ : चव्हाणवाडी येथे निर्माण झालेल्या तीव्र पाणी टंचाई, प्रशासनाकडून होत असलेले दुर्लक्ष यामुळे गावातील महिला संतप्त झाल्या आहेत.
पाटण तालुक्यातील चाफळ विभागात डोंगरावरील दुर्गम असलेलं ४५० लोकसंख्या असलेल्या चव्हाणवाडी (नाणेगाव) गावाला पिण्याच्या पाण्यासाठी सार्वजनिक आड (विहीर) च्या रूपाने एकमेव स्रोत आहे. त्या आडातील पाण्याने तळ गाठला असल्याने गावात भीषण पाणी टंचाई भासत आहे.
गावातील लोक अक्षरश: तांब्याने आडातील पाणी काढून गाळून वापर करत आहेत. गावातील बहुतांश कर्ते पुरुष उदरनिर्वाहासाठी पुणे- मुंबई येथे नोकरीनिमित्त असल्याने ज्या कुटुंबात वृद्ध व लहान मूल असलेल्या महिलांना मुलांना घरात एकटं ठेऊन अथवा सोबत घेऊन पाण्यासाठी रात्र रात्र नंबर लावून आडावर काढावी लागत आहे. ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी वेळोवेळी प्रशासनाकडे टँकर सुरु करण्याची मागणी करूनही प्रशासनकडून योग्य ती दखल घेतली जात नाही आहे. तळ गाठलेल्या आडातील पाणी हे पिण्यायोग्य नसल्याने तांब्याने उपसल्या जाणाऱ्या पाण्याने आरोग्याला हानी पोहोचण्याची शक्यता आहेच. अशा दुर्गम भागात हिंस्त्र पशूंचा वावरही असतो. शिवाय रात्री-अपरात्री पाण्यासाठी रात्र-रात्र आडावर काढणाऱ्या वृद्ध व महिला अथवा त्यांचे घरात ठेवलेले लहान मुलबाळ यांच्या बाबतीत एखादी वाईट घटना घडल्यावर या प्रशासनाला जाग येणार आहे का? अशा अनेक संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांतून येत आहेत. त्यामुळे लवकर पाण्याचा टँकर सुरु करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या वतीने टँकर सुरु करणेबाबत पंचायत समिती याना अनेक निवेदने दिली आहेत. मात्र आश्वासन व्यतिरिक्त अजून कोणतीही भूमिका प्रशासनाकडून घेतली जात नाही आहे. तरी लवकरात लवकर दखल घेऊन प्रशासनाने टँकर सुरू करावा.
- विठ्ठल चव्हाण, सदस्य, ग्रामपंचायत चव्हाणवाडी.