maharashtra

जिल्हा शिवसेनेच्या गटांचे समांतर शक्तिप्रदर्शन

ठाकरे आणि शिंदे गटामध्ये राजकीय रस्सीखेच

सातारा जिल्ह्यातील जिल्हा शिवसेनेची शिवसेना आणि शिंदे प्रणित शिवसेना अशी दोन शकले झाली आहेत. या दोन्ही गटांच्या जिल्हा कार्यकारिणी जाहीर झाल्या असून दोन्ही गटांचा समांतर शक्तिप्रदर्शनाचा प्रवास सुरू झाला आहे. आगामी जिल्ह्याच्या राजकीय घडामोडींमध्ये दोन्ही गट एकमेकांना शह-काटशह देणार हे आता निश्चित झाले आहे.

सातारा : सातारा जिल्ह्यातील जिल्हा शिवसेनेची शिवसेना आणि शिंदे प्रणित शिवसेना अशी दोन शकले झाली आहेत. या दोन्ही गटांच्या जिल्हा कार्यकारिणी जाहीर झाल्या असून दोन्ही गटांचा समांतर शक्तिप्रदर्शनाचा प्रवास सुरू झाला आहे. आगामी जिल्ह्याच्या राजकीय घडामोडींमध्ये दोन्ही गट एकमेकांना शह-काटशह देणार हे आता निश्चित झाले आहे. शिवसेना नक्की कोणाची, हा वाद घटना पिठा कडे वर्ग झाल्याने कोणता गट कोणाला भारी पडणार, याचे उत्तर आत्ताच देणे अवघड आहे. सातारा जिल्ह्याला शिंदे गटाचे दोन आमदार लाभले असून यामध्ये पाटणचे आमदार व विद्यमान उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई व कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांचा समावेश आहे. साताऱ्यात शिंदे जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये ठाकरे गटाचे कट्टर असणारे चंद्रकांत जाधव शिंदे गटात सामील झाल्याने त्यांच्याकडे संघटक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणात बाजूला पडलेले पुरुषोत्तम जाधव अचानक चर्चेत घेऊन त्यांच्याकडे शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा शिवसेनेच्या दोन गटांचा जिल्ह्यातच समांतर प्रवास सुरू झाल्याने आगामी नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकाच पक्षाच्या दोन गटांमध्ये राजकीय संघर्ष पहायला मिळणार आहे. शिंदे गट सत्तेत सामील असल्यामुळे त्यांची बाजू कदाचित वरचढ होऊ शकते. पण सातारा जिल्ह्यातला मूळ शिवसैनिक कोणता कौल घेतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पाटण तालुक्यात आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेच्या माध्यमातून मूळ शिवसैनिकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्याला मंत्री देसाई यांनी सुद्धा भव्य शक्तिप्रदर्शन करून जोरदार प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र आगामी निवडणुकीत शिवसैनिकांची मोट गटाकडून कशी भरून काढली जाणार याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात राजकीय भूकंप झाला. शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर त्याचे पडसाद राजकारणात गेले दीड-दोन महिने पाहायला मिळत आहेत. मंत्री देसाई यांनी बंडखोरी केल्यानंतर तालुक्यात शिवसेनेला कोणी वाली नाही अशी हवा समर्थकांनी तयार केली होती. मात्र शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंत शेलार यांच्या जागी उद्धव ठाकरे यांनी माजी जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांची तातडीने नेमणूक करून पहिला राजकीय डाव टाकला. आमदार शंभूराज देसाई यांच्या शिफारशीने नेमणूक झालेल्या जयवंत शेलार यांना हटवून देसाईंना पहिला झटका दिला. हर्षद कदम यांनी तालुका प्रमुख सुरेश पाटील, रवी पाटील या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आदित्य ठाकरे यांचा मेळावा यशस्वी केला.
जिल्ह्यात ठाकरे गट आणि शिंदे गट दोन्ही गटांचे जोरदार शक्तिप्रदर्शन सध्या सुरू आहे. कोरेगावात सध्या महेश शिंदे यांचा गट फॉर्मात असून त्यांना काटशह देण्याकरता महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादीचे विधानपरिषद नेते शशिकांत शिंदे यांनाही जोरदार शक्तिप्रदर्शन करावे लागणार आहे. महा विकास आघाडीतील शिवसेनेचे जिल्हा संपर्क नेते म्हणून दिवाकर रावते, नितीन बानुगडे-पाटील यांनाही कोरेगावात वेगळी रचना आखावी लागणार आहे. दोन्ही गटाच्या जिल्हा कार्यकारणी आता निश्चित झाल्या असून मूळ शिवसैनिक कोणत्या गटाचा आणि मूळ शिवसेना कोणाची, हे राजकीय संदर्भ आता कायदेशीर घटना पिठावर तपासले जाणार आहेत. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेची वाटचाल कोणत्या गटाला धार्जिणी असणार, याचे उत्तर कायद्यालाच विचारावे लागणार आहे.